तुझ्यामुळे माझी रिक्षा ठोकली; अशी धमकी देत रिक्षाचालकाने….

0
238

पिंपरी, दि. 14 (पीसीबी): रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला अडवून दोघांनी त्याच्याकडे रिक्षाची भरपाई म्हणून पाच हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुला सोडणार नाही, असे म्हणून तरुणाच्या खिशातून आठ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. याबाबत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास दुर्गा चौकाच्या जवळ दुर्गानगर झोपडपट्टी निगडी येथे घडली.

शिवा सुरेश वाडकर (वय 21, रा. दुर्गानगर, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या सोबत प्रथमेश दिलीप कांबळे (वय 18, रा. यमुनानगर, निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिनेश राजेंद्र कांबळे (वय 21, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी कांबळे दुर्गानगर झोपडपट्टी येथील दुर्गा चौकाच्या जवळ रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी रिक्षातून त्यांच्याजवळ आले. फिर्यादी यांच्यामुळे आरोपींची रिक्षा ठोकली आहे, असे म्हणून रिक्षाची भरपाई पाच हजार रुपये दे, नाहीतर तुला सोडणार नाही. असे आरोपींनी फिर्यादी यांना धमकावले. त्यानंतर फिर्यादींकडील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि एक हजार रुपये रोख रक्कम असा आठ हजारांचा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.