‘ती’ तब्बल आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत रहात होती; धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

0
238

मुंबई,दि.२३(पीसीबी) : मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे मात्र धक्कादायक बाब म्हणजे मार्च महिन्यातच महिलेचा मृत्यू झाला असून यानंतरही महिलेच्या ५३ वर्षीय मुलीने याबाबत कोणालाही माहिती न देता मुलगी गेल्या तब्बल आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबतच राहत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसंच आईच्या मृत्यूसंबंधी विचारण्यात आलेलं प्रश्न, मृत्यूचं कारण यासंबंधी काहीही उत्तर देऊ न शकल्याने मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

महिलेची मुलगी घऱाच्या खिडकीतून कचरा फेकत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस घरी पोहोचले असता मुलगी संपूर्ण लॉकडाउनदरम्यान आपल्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या समोर आली. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता महिलेच्या मुलीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळेच मुलीने आईच्या मृतदेहासोबत कोणाला माहिती दिली नसावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेने काही वर्षांपूर्वी आपल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतरही अशाच पद्दतीने कोणाला न कळवता घरात मृतदेह ठेवला होता अशी माहिती देखील तपासात समोर आली आहे.