तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचा, हे चालक नाही, त्यात बसलेली सवारी ठरविते – देवेंद्र फडणवीस

0
283

मुंबई,दि.२७(पीसीबी) – तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचा, हे चालक नाही, त्यात बसलेली सवारी ठरविते असं म्हणत भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

फडणवीस म्हणाले,”त्या मुलाखतीमध्ये विद्वान संपादक. आमचं पटत नसलं, तरी ते विद्वान आहेत हे मी मानतो. ते राज्य सभेचे सदस्यही आहेत. ते मुख्यमंत्र्यांना विचारतात की, मी साखर उद्योगाचे प्रश्न घेऊन अमित शाह यांना कशासाठी भेटलो. आता यांना इतकंही माहिती नाही की, साखर उद्योगाला मदत देण्यासाठी केंद्रात जो मंत्रिगट तयार झाला, त्याचे अध्यक्ष अमित शाह हे आहेत. त्यामुळे त्यांना भेटलो. शरद पवार यांनी सुद्धा साखर उद्योगासंबंधात पत्र लिहिली आहेत, ती काही आदेश बांदेकरांना नाही लिहिलेली. ती त्यांनी अमित शाह यांनाच लिहिली आहेत. आता हे जर सरकारमधील नेतृत्वाला आणि संपादकांना माहिती नसेल, तर शेतकऱ्यांचे काय होणार,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटलं होतं त्यालाच “तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचा, हे चालक नाही, त्यात बसलेली सवारी ठरविते ” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.