ताथवडेमध्ये धारदार हत्यारांनी वार करुन तरुणाचा निर्घृण खून

0
798

ताथवडे, दि. २९ (पीसीबी) – धारदार हत्यारांनी वार करुन एका १९ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी सातच्या सुमारास ताथवडे येथून उघडकीस आली.

जुबेर गुलाब मुजावर (वय १९, रा. सपकाळ चाळ, सोनवणे वस्ती, ताथवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील गुलाब मुजावर यांनी  वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ताथवडे येथील बालाजी कॉलेजला जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता जुबेर हा जखमी आवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. जुबेर याच्या डोक्यात, मानेवर आणि पोटात धारदार हत्याराने वार झाल्याचे समोर आल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र त्याला कोणी आणि का मारले हे अद्याप समजु शकले नाही. वाकड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.