तळेगावमध्ये घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरुन दोन महिलांमध्ये हाणामारी; चावा घेऊन बोट केले फ्रॅक्चर

0
855

तळेगाव, दि. ३१ (पीसीबी) – घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरुन दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यातील एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या दोन्ही हातांचा चावा घेतला. तसेच त्या महिलेच्या हाताचे बोट देखील फ्रॅक्चर केले. ही घटना मंगळवार (दि.३०) सकाळी नऊच्या सुमारास तळेगाव स्टेशनजवळील यशवंतनगर येथील आशापुरी सोसायटी फ्लॅट क्र. ५ मध्ये घडली.

कावेरी नामदेवराव साळुंके (वय ३८, रा. आशापुरी सोसायटी, फ्लॅट क्र.५, शिवाजी चौक, यशवंतनगर, तळेगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ललिता सुरेश शिवनेकर (रा. आशापुरी सोसायटी, फ्लॅट क्र.८, शिवाजी चौक, यशवंतनगर, तळेगाव) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी कावेरी आणि आरोपी ललिता या आशापुरी सोसायटीमध्ये राहतात. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ललिता यांनी कावेरी यांच्या घरासमोर कचरा टाकला. यामुळे दोघींमध्ये बाचाबाची होऊन भांडण झाले. यादरम्यान आरोपी ललिता यांनी कावेरी यांच्या दोन्ही हातांचा चावा घेतला. तसेच त्यांच्या उजव्या हाताचे पहिले बोट देखील फ्रॅक्चर करुन जखमी केले. ललिता यांना अद्याप अटक करण्यात आलेले नाही. तळेगाव पोलिस तपास करत आहेत.