‘…तर मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या सभेत पारित करा’: राऊतांच भाजपाला खुलं आव्हान

0
283

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : बेळगाव महापालिकेवर भगवा झेंडाच फडकला आहे असा दावा भाजपने केला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकला असा दावा करताय तर मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून हे आव्हान दिलं आहे. बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला. मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.

बेळगावच्या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांना बेळगाव मध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेशमा पाटील अशी अनेक मराठी माणसं ही मराठी वाटत नाही का?, असा सवाल पडळकर यांनी केला आहे. कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाच एवढा आकस का? महाराष्ट्राच्या मतदाारने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे व कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दिल्लीतल्या मॅडमला व युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठीजणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुक़शाहीचा वापर केला. वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथूनपुढेही भोगावा लागणार आहे. किंबहूना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या 15 कोटीच्या ‘पेंग्विन ‘ विकासाचा मॉडल नाकारले आहे. हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता व इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय. तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय, असा हल्लाही त्यांनी चढवला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राऊतांवर टीका केली होती. ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हणलं की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असं थेट आव्हानच पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसंच बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचं पाटील यांनी आवर्जुन सांगितलं होतं.

बेळगाव सीमा वादाबाबत पत्रकारांनी विचारलं असता, वर्षानुवर्षे आमचा मुद्दा हा आहे की दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसणं वाढवलं पाहिजे. हा सगळा न्यायालयीन विषय आहे तो कधी सुटेल तेव्हा सुटेल. तोपर्यंत तिथल्या मराठी भाषिकांना सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाची एकच भूमिका आहे की, हा सगळा मराठी भाषिक भाग आहे आणि तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, असंही ते म्हणाले होते.