…तर अजित पवारांनी भाजपमध्ये सगळ्यांच्या आधी प्रवेश करायला हवा – शिवसेना  

0
705

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  आयकर विभाग , ‘ईडी’या सारख्या  संस्थांचा  वापर करून आमदार फोडले जात आहेत,  असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवार यांनी केला आहे. या आरोपाला शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून सडेतो़ड उत्तर देण्यात आले आहे. जर असे असते, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपमध्ये सगळय़ात पहिला प्रवेश करायला हवा होता,  असा टोला आजच्या (सोमवार) अग्रलेखात लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखाते म्हटले आहे की, महाराष्ट्रासह देशभरात सध्या पक्षांतराची लाट आली आहे. एका बाजूला मुसळधार पाऊस पडत आहे, तर दुसऱया बाजूला पक्षांतराच्या मुसळधार प्रवाहात बरेच लोक वाहून जात आहेत. लोकशाहीच्या नव्या व्याख्येत यास ‘जिवंत लोकशाही’ म्हटले जाते. या जिवंतपणाचे जरा जास्तच अजीर्ण महाराष्ट्राला झाले आहे काय? असा प्रश्न लोकांना पडू शकतो. महाराष्ट्रातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘घाऊक’ पक्षांतराने वाहून गेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार रांगा लावून भाजप प्रवेशासाठी उभे आहेत. यावर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. हे राजकारण फोडाफोडीचे आहे. इन्कम टॅक्स, ‘ईडी’सारख्या एजन्सीचा वापर करून आमदार फोडले जात आहेत असा पवारांचा आरोप आहे. शिवसेनेकडे आयकर, ईडी, पोलीस या संदर्भातली कोणतीही खाती नाहीत. त्यामुळे हा आरोप शिवसेनेस लागू होत नाही. प्रश्न इतकाच आहे की, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे व चौकशांची तलवार डोक्यावर असलेले लोक काँग्रेस पक्षात होते व तेच भीतीपोटी पक्षांतर करीत आहेत.

मात्र असा दबाव खरोखरच असता तर अजित पवार यांनी भाजपमध्ये सगळय़ात पहिला प्रवेश करायला हवा होता. भाजपचे प्रांतिक अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर कोणतीही लपवाछपवी न करता आता सांगितले आहे की, भाजपमध्ये सध्या जी ‘आयाराम’ मंडळींची रीघ लागली आहे ती स्वार्थासाठी लागली आहे. पाटलांच्या या वक्तव्यामुळे कुणाला धक्का वगैरे बसण्याचे कारण नाही. सध्याच्या राजकारणातले ‘कटू’ सत्य त्यांनी कोल्हापुरी ठसक्यात सांगितले आहे. राजकारणाचा खरा चेहरा चंद्रकांतदादांनी समोर आणला. राजकारणात कोणी साधू-संत राहिलेला नाही. तो काळ लयास गेला. गेल्या पाचेक वर्षांत भारतीय जनता पक्षात ‘इनकमिंग’ वाढले आहे ते काही विचार किंवा तत्त्वे पटत आहेत म्हणून नाही. सत्तेचे लोहचुंबक व राजकीय सोय हेच त्यामागचे कारण आहे. जिथे

सत्तेच्या गुळाची ढेप

तेथे मुंगळे जाणार व ढेपेस चिकटून बसणारच हा राजकीय नियमच बनला आहे. महाराष्ट्रात व देशभरात गेल्या सत्तरेक वर्षांपासून याच धोरणाने राजकारण सुरू आहे. एक जमाना असाही होता, जो उठला किंवा जन्माला आला तो काँग्रेसमध्ये जात होता, जसे आज भाजपमध्ये जात आहेत. काँग्रेस पक्षाला शिव्या घालणारे, लाखोल्या वाहणारे भले भले लोक एका रात्रीत चार आण्याची गांधीटोपी डोक्यावर चढवून काँग्रेसवासी झालेले देशाने पाहिले आहेत. इंदिरा गांधी यांनी तर स्वतःचाच पक्ष फोडला व विरोधी पक्षही फोडले. इंदिरा लाटेवर तेव्हा सगळेच स्वार झाले होते जसे आज मोदी लाटेवर स्वार झाले आहेत, पण जनता पक्षाची स्थापना होताच जगजीवनरामांपासून भले भले काँग्रेसचे पुढारी काँगेस सोडून जनता पक्षात गेले. जनता पक्षातले अर्धे लोक जुने काँग्रेसवालेच होते, पण आपल्याकडे या प्रकारांना पक्षांतरे किंवा द्रोह म्हणायचे नसते, तर तात्त्विक मतभेद व व्यापक राष्ट्रहितासाठी त्याग केला असे म्हणायची प्रथा आहे. असा त्याग सदैव सुरूच असतो.

गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांनी व कर्नाटकात दहा-बारा काँग्रेस आमदारांनी असाच त्याग केल्याचे प्रकरण नुकतेच घडले. मध्य प्रदेशच्या विधानसभेत भाजपच्या दोन आमदारांनी ‘त्याग’ करून कमलनाथ यांना पाठिंबा दिला. प. बंगालातही तृणमूल काँग्रेसचे लोक भाजपमध्ये जाऊन त्याग करण्यास तयार झाले आहेत. हे समजून घेतले तर चंद्रकांत पाटील यांचे परखड वक्तव्याचे मोल समजून येईल. पूर्वी दसरा-दिवाळीस रवा, साखर, तेलासाठी रेशनिंगच्या दुकानात रांगा लागायच्या तशा रांगा भाजप, शिवसेनेच्या बाहेर लागल्या आहेत. महाराष्ट्रात पक्षांतराचे रेशनिंग सुरू आहे, पण रेशनिंग दुकानात पूर्वी व्हायचा तसा काळाबाजार येथे नाही.

आम्ही काही कुणाला जोरजबरदस्ती करूनशिवसेनेने फरफटत आणले नाही. बुडत्या जहाजातून उंदीर, बेडूक पटापट उड्या मारतात, पण बोटीचे कप्तान व इतर महत्त्वाचे लोक सगळय़ात शेवटी धीराने बाहेर पडतात. आम्ही अशा ‘धीरा’च्या लोकांना नक्कीच घेत आहोत व त्याबद्दल राज्यातील काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवाल्यांना खळखळ करायची गरज नाही. त्यांचेही पक्ष याच पद्धतीत तरारले आहेत. शिवसेनेची पंचवीस-पंचवीस वर्षे ‘वतनदारी’ केलेले लोक तुम्ही याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गुळाच्या ढेपेवर नेऊन बसवलेच ना? शिवसेनेने निवडून आणलेले आमदार, माजी मुख्यमंत्री, महापौर वगैरे लोक तुम्ही ‘तत्त्व’ आणि ‘त्याग’ वगैरे उपाध्या लावून शुद्ध करून घेतलेच ना? तेव्हा सूत्रे तुमच्याकडे होती. आज ती आमच्याकडे आहेत. राजकारणात फोडा, झोडा व राज्य करा या ब्रिटिश नीतीचा अवलंब जिल्हा परिषदांपासून ते राज्याच्या विधानसभा, लोकसभेपर्यंत अवलंबणारे काँग्रेसवालेच होते. शिवसेना-भाजपसही या ‘अच्छे दिना’ची कोवळी किरणे आता मिळत असतील तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने घामाघूम होण्याचे कारण नाही.

राजकारणातून तत्त्व, विचार, निष्ठा हे शब्द हद्दपार झाले आहेत. राजा हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेल्या शब्दास जागून राज्यत्याग केला. आज लोक स्वप्नात पक्षत्याग करतात. कोण काय करणार? ‘‘सध्याच्या राजकारणापेक्षा वेश्या परवडल्या,’’ असे परखड मत एकदा शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केले होते. त्यामागचा त्रागा आणि संताप समजून घ्यायला हवा. म्हणूनच आमचा तोडीफोडीवर विश्वास नसून मने जिंकण्यावर विश्वास आहे. ज्यांना शिवसेनेचा विचार पटतोय त्याने एक शिवसैनिक म्हणून अवश्य आमच्या परिवारात यावे. मनगटावर शिवबंधन बांधावे व कामास लागावे. आतापर्यंत लाखो शिवसैनिकांच्या काबाडकष्टातून शिवसेना उभी राहिली व पुढे गेली, याची जाणीव आम्हाला सदैव आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे राज्य पुन्हा यावे ही तर श्रींचीच इच्छा आहे.