डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार; मोदी सरकार तोंडघशी

0
1077

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – यावर्षीच्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उपस्थित राहता येणार नाही, असे अमेरिकेने पत्र लिहून कळवले आहे, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिली.  भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अमेरिकेत एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे ट्रम्प यांना येता येणार नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.

प्रजासत्ताक दिनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी ट्रम्प यांना भारताकडून जुलै महिन्यात निमंत्रण दिले आहे. अमेरिकेनेही निमंत्रण मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच सप्टेंबरच्या द्विपक्षीय करारनंतर यावर निर्णय घेऊ’ असे अमेरिकेने म्हटले  होते.

दरम्यान, इराणमधून तेल आयात करण्यावर अमेरिकेने जागतिक बहिष्कार टाकला होता. तर दुसरीकडे ही बंदी झुगारून भारताने इराणकडून तेल आयात करणे चालूच ठेवले होते. तसेच अमेरिकेचा पारंपरिक शत्रू असलेल्या रशियाकडून भारताने एस ४०० क्षेपणास्त्र विकत घेतले. या दोन घटनांमुळे भारत-अमेरिकेदरम्यान तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारताला लवकरच त्यांच्या चुकीची जाणीव करून देऊ, असे सूचक विधान ट्रम्प यांनी केले होते. त्यामुळेच भारतात येण्यास ट्रम्प यांनी नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.