डॉ. सावंत यांच्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार !

0
404

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे सलग दोनवेळा प्रतिनिधीत्व केलेले राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या राजीनामा मंजूर झाल्यास शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांवरही राजीमामा देण्यासाठी दबाव येऊ शकतो. त्यामुळे उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार उभी राहिली आहे. 

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी यावेळी सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारून बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे  सावंत यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, शिवसेनेकडे  ५ कॅबिनेट मंत्रिपदे असून एकनाथ शिंदे यांच्याशिवाय मंत्रिपदावर विधान परिषद आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्यामुळे विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात यावीत, अशी शिवसेनेच्या आमदारांची मागणी आहे. या मागणीला उध्दव ठाकरे यांनी अनुकूलता दाखवली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. यात सुभाष देसाई, दिवाकर रावते या मंत्र्यांची मंत्रिपदे काढून नवीन चेहऱ्यांची वर्णी लावली जाऊ शकते. रवींद्र वायकर, विजय शिवतारे या राज्यमंत्र्यांना बढती दिली जाऊ शकते. तर त्यांच्या जागी नवीन आमदाराला संधी मिळू शकते. त्यामुळे सावंत यांचा राजीनामा मंजूर  झाल्यास मंत्रिपदासाठी शिवसेनेतील इच्छुक आमदारांना संधी मिळू शकते.