ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे कोट्याधीश  

0
677

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आज (गुरूवार) उमेदवारी अर्ज दाखल केला.  उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. ठाकरे कुटुंबियातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य  असलेले आदित्य  कोट्याधीश असल्याची माहिती समोर आली आहे.

आदित्य ठाकरे यांनी पेशाने व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले असून त्यांच्या नावांवर ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे.  यात १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवी आहेत. २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. साडेसहा लाखांची एक बीएमडब्लू बाईक आहे. ६४ लाख ६५ हजारांच्या सोन्याचा यामध्ये समावेश आहे. तर १० लाख २२ हजार अशी एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती  नावावर आहे.

दरम्यान, आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपचे मलबार हिलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी एकूण ४४१ कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर २८३ कोटींचे कर्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.