‘ट्विटर’च्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल

0
318

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – ट्विटरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर जॅक यांनी ट्विटरमधील मोठ्या खांदेपालटाची घोषणा केली व सीईओ पदाची जबाबदारी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांच्या खांद्यावर सोपवली. जॅक डोर्सीच्या या घोषणेनंतर एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने ट्विटर कंपनीत सर्वोच्च पद पटकावल्याचा आनंद व्यक्त केला. भारतीयांकडून सध्या पराग अग्रवालचं भरभरून कौतुक होत आहे. तर ट्विटर सीईओच्या पदासाठी परागच्या नावाची घोषणा झाल्यावर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पॅट्रिक कॉलिसन यांनी परागच्या अभिनंदनासाठी एक ट्विट केलं होतं. तर एलॉन मस्क यांनी पॅट्रिक यांच्या ट्विटवर कमेंट करत भारतीय प्रतिभेचं कौतुक केलं आहे. भारतीय प्रतिभेचा अमेरिकेला फायदाच होत आला आहे, अशी प्रतिक्रिया एलॉन मस्क यांनी दिली आहे.

अनेक मोठ्या कंपन्या भारतात वाढलेल्या सीईओद्वारे चालवल्या जातात. तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचं यश हे अमेरिकेने स्थलांतरीतांना दिलेल्या संधीची एक चांगली आठवण असल्याचं ट्विट पॅट्रिक यांनी केलं होतं. याच ट्विटला उत्तर देत एलॉन मस्क यांनी भारतीयांच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.