ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनिष्ठेपेक्षा पुत्रप्रेमाला जास्त प्राधान्य दिले – राहुल गांधी

0
454

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनिष्ठेपेक्षा पुत्रप्रेमाला जास्त प्राधान्य दिले. मुलांना तिकीट मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांकडून दबाव आणला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील आपल्या मुलांना उमेदवारी देण्यासाठी दबाव आणला. मात्र मी त्याबाबत फारसा अनुकूल नव्हतो, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  

दिल्लीत शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत   राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा  राजीनामा सादर केला होता. परंतु त्यांचा राजीनामा फेटाळला होता.  या बैठकीत   राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करताना ज्येष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली.

ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, अशा राज्यांमध्ये पक्षाची कामगिरी अत्यंत खराब झाली. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाच्या नेत्यांनी म्हणावे तसे गांभीर्य दाखवले नाही. प्रचारादरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवरून भाजप आणि मोदींविरोधात एक भक्कम जनमत तयार केले गेले नाही, अशी नाराजीही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.