ज्येष्ठ ऑलिंपिक विजेतीचे आयुष्याचे शतक

0
217

बुडापेस्ट दि.२५ (पीसीबी) : ऑलिंपिक स्पर्धेचा जणू चालता बोलता इतिहास म्हणून ज्यांच्याकडे बघावे अशा हंगेरीच्या ज्येष्ठ जिम्नॅस्टिक खेळाडू अॅग्नेस केलेटी या पुढील महिन्यात आयुष्याची शंभरी गाठणार आहेत. आपल्या आयुष्याबद्दल बोलताना त्या म्हणतात, ‘मला खूप छान वाटत आहे. मी कधी आरसा पाहिला नाही. कदाचित माझ्यासाठी मी नेहमीच तरुण राहिले.’ कारकिर्दीत पाच वेळा ऑलिंपिक विजेत्या राहिलेल्या केलेटी ९ जानेवारीस आपला शंभरावा वाढदिवस साजरा करणार आहेत. केलेटी या हंगेरीच्या सर्वात यशस्वी जिम्नॅस्टिक खेळाडू राहिल्या आहेत. खेळाच्या इतिहासात तिच्याकडे एक आकर्षक यहुदी खेळाडू म्हणून बघितले जाते. सध्या ती डिमेन्शियाने आजारी आहे. त्यामुळे तिच्या स्मृतीवर परिणाम झाला आहे. असे असूनही तिचा उत्साह कमी झालेला नाही. तिच्या घराभोवती जरा चक्कर मारली, तर तिने कारकिर्दीत मिळविलेली ऑलिंपिक पदके आणि स्मृतिचिन्हे दृष्टिस पडतात.

या वयात माझ्यासाठी हे चांगले नाही. पण, मी अशीच आहे असे जेव्हा मी माझ्या केअरटेकरला सांगते, तेव्हा ती हसते. अलिकडेच ‘जिम्नॅस्टिकची राणी- अॅग्नेस केलेटीची शंभर वर्षे’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्या वेळेसही केलेटी कमालीच्या आनंदी होत्या. ऑलिंपिक वैभव आणि होलोकॉस्ट एस्केपसह केलेटी यांची जीवनगाथा एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या कथेसारखी वाटते.केलेटी यांचा जन्म १९२१ मध्ये झाला. त्यांनी कारकिर्दीत एकूण १० पदके जिंकली. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक पदके त्यांनी वयाच्या तिशीनंतर जिंकली. त्या वेळी ती आपल्या पेक्षा अर्ध्या वयाच्या स्पर्धकांशी स्पर्धा करत होती. यामध्ये हेलसिंकी १९५२ आणि मेलबर्न १९५६ ऑलिंपिकमधील पाच सुवर्णपदकांचा समावेश होता. आवड किंवा बरे वाटते म्हणून नाही, तर जग बघायचे होते म्हणून आपण खेळायला सुरवात केली, असे त्या नेहमी सांगतात.

कठिण कालावधी
केलेटी यांची १९३९ मध्ये राष्ट्रीय संघात वर्णी लागली. त्यानंतर एका वर्षातच म्हणजे १९४० मध्ये त्यांनी पहिले हंगेरियन विजेतेपद जिंकले. पण, त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. ती धर्माने यहुदी होती. यहुदी पार्श्वभूमीमुळे तिला कोणत्याही क्रीडा उपक्रमात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती. तिचे हंगेरीत जगणे मुष्किल झाले होते. नाझीवाद जपणाऱ्या जर्मनीने १९४४ मध्ये हंगेरीचा ताबा घेतला. तेव्हा खोटी कागदपत्रे सादर करून केलेटी या मृत्युछावणीतून पळून गेल्या. त्या वेळी त्यांची पिरोस्का जुहाझ या एका मोलकरणीशी गाठ पडली. या पिरोस्काचे आपल्यावर मोठे उपकार आहेत. तिच्यामुळेच मी जिंवत राहू शकले असे त्या नेहमी म्हणतात. हंगेरीच्या ग्रामीण भागत लपून छपूनच रहात त्यांचे आयुष्य गेले. नाझी जर्मनीने उभारलेल्या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये केलेटी यांचे वडिल आणि कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले. तेव्हा एक स्विजीश मुत्सही राऊल वॉलेनबर्ग यांच्यामुळे केलेची, तिची आई आणि भावाची सुटका करण्यात आली.

केलेटी पुढे हंगेरीच्या सोव्हिएटविरोधी उठाामुळे १९५७ मध्ये ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाली. केलेटी यांनी १९५९ मध्ये हंगेरीचे क्रीडा शिक्षक रॉबर्ट बिरो यांच्याशी लग्न केले. त्यांना पुढे दोन मुले झाली. केलेटी यांनी स्पर्धात्मक कारकिर्दीला पूर्णविराम दिला, तरी खेळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी शारीरिक शिक्षण शिक्षिका म्हणून काम पाहिले. त्या इस्राएलच्या जिम्नस्टिक प्रशिक्षिकाही होत्या.