जेजुरीचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची मागणी ; ‘भाविकांना सोशल डिस्टंसिंग पाळून दर्शन देऊ’, विश्वस्त मंडळाची भूमिका

0
1185

जेजुरी, दि.२७ (पीसीबी) : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले होते. मात्र आता ‘मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे,’ अशी मागणी खंडोबा देवस्थानचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा विनंती प्रस्ताव पाठवला जाणार आहे. अशी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त संदीप जगताप व विश्वस्त शिवराज झगडे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडोबाचे मंदिर कोरोनामुळे १८ मार्चपासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे भाविक कमी झाल्याने जेजुरीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जेजुरीतील सर्व जाती-धर्माच्या लोकांची उपजीविका येथे येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. मंदिरच बंद केल्याने लहान मोठ्या व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने खंडोबा मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्याची आवश्यकता असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. शासनाकडून येणाऱ्या भाविकांच्या देवदर्शनासाठीच्या सर्व आदेश व नियमांची योग्य अंमलबजावणी करून भाविकांना सोशल डिस्टंसिंग पाळून दर्शन देऊ अशी भूमिका विश्वस्त मंडळाने घेतली आहे.