जुनी सांगवी येथे आंबेडकर जयंतीच्या नियोजनावेळी वाद : पाच जणांवर गुन्हा, तिघांना अटक

0
378

सांगवी, दि. १५ (पीसीबी) – जुनी सांगवी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे नियोजन करत असताना फटाके वाजवण्यावरून वाद झाला. त्यातून पाच जणांनी मिळून आयोजकांना शिवीगाळ, दमदाटी करत परिसरातील लोकांनाही दमदाटी केली. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री घडली.

आदित्य उर्फ पक्या बाळू कांबळे (वय 23), प्रथम सुनील वैराट (वय 21), यश दीपक सावंत (वय 19, तिघे रा. जुनी सांगवी), साहिल उर्फ सँडी मोरे, पिल्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यशपाल काशिनाथ सोनकांबळे (वय 38, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे संगमनगर चौक जुनी सांगवी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामुदायिक धम्म वंदना झाल्यानंतर गुरुवारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे नियोजन करत होते. त्यावेळी आरोपी आदित्य याने तिथे फटाके वाजवले. त्यामुळे फिर्यादी यांनी आदित्य याला लांब जाऊन फटाके वाजवण्यास सांगितले. त्यावरून आदित्य याने त्याच्या साथीदारांना घेऊन फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. पाहून घेण्याची धमकी देत उपस्थित नागरिकांना देखील शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दुचाकीचे मोठे आवाज करून दहशत निर्माण करून आरोपी निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आदित्य, प्रथम आणि यश या तिघांना अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.