जागतिक टे.टे. पात्रता – मनिका, श्रीजा मुख्य फेरीच्या उंबरठ्यावर

0
162

दोहा, दि.०३ (पीसीबी) – भारताची युवा टेबल टेनिस खेळाडू श्रीजा अकुला आणि राष्ट्रकुल विजेती मनिका बात्रा यांनी जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत पात्रतेच्या अखेरच्या फेरीत प्रवेश केला. यामुळे आता स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी या दोघींना मिळू शकते. फक्त, त्यांना अखेरच्या फेरीचा अडथळा दूर करावा लागेल. पुरुष खेळाडूंसह मिश्र दुहेरीत भारताच्या अंचता शरत कमाल-मनिका बात्रा जोडीला अपयश आले.

हैदराबादच्या श्रीजा हिने आपल्या खेळात कमालीची सुधारणा करताना जागतिक क्रमवारीत ७४व्या स्थानावर असणाऱ्या चिलीच्या वेगा पौलिना आणि थायलंडच्या ओरावान पारानांग या दोघींचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत १५०व्या स्थानावर असणाऱ्या श्रीजाने ओरावान हिचा ११-५, ११-५, ११-६ असा पराभव करून अखेरच्या फेरीत प्रवेश केला. आता अखेरच्या फेरीत तिची गाठ रशियाच्या मारिया तिआलाकोवा हिच्याशी पडणार आहे. तिने भारताच्या अर्चना कामथ हिचा १४-१२, ११-८, ११-८ असा पराभव केला.

मनिकाने रुमानियाच्या इरिना सिओबानू हिचा ११-७, १५-१३, ११-८ असा पराभव केला. अखेरच्या फेरीत तिची गाठ युक्रेनच्या गॅना गापोनोवा हिच्याशी पडणार आहे.

त्यापूर्वी गणशेखरन साथियन आणि सुतिर्थ मुखर्जी यांनी मिश्र दुहेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश करताना प्युएर्टो रिकोच्या डॅनिएल गोन्झांलेझ-मेलानु दिआझ जोडीचा ११-५, ११-७, ११-५ असा पराभव केला. मात्र, अंचता शरथ कमाल आणि मनिका बात्रा जोडीला मुख्य फेरी गाठण्यात अपयश आले. त्यांना रशियाच्या अॅलेक्झांडर शिबाएव आणि पोलिना मिखाईलोवा जोडीकडून ११-९, ११-१३,११-१३, ३-११ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत हरमीत देसाई याला देखिल अपयश आले. त्याला रशियाच्या अॅलेक्झांडर शिबाएव याच्याकडून ११-९, ११-७, ९-११, ८-११, २-११ असा पराभव पत्करावा लागला.