जयंत पाटलांचा मोबाईल क्रमांक हॅक; गोपीचंद पडळकरांना मदत करण्याचे केले कॉल   

0
593

सांगली, दि. २३ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक केला. त्यानंतर त्यांच्या मोबाईल क्रमांकवरून सांगली लोकसभा मतदार संघात अपप्रचार  करण्यात आला. हा प्रकार सोमवारी समोर आला. या प्रकरणी जयंत पाटील यांनी  सोमवारी रात्री उशिरा  इस्लामपूर पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली  आहे.  कार्यकर्ते आणि मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली लोकसभा मतदारसंघात आज (मंगळवार)  मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून ‘आपणास गोपीचंद पडळकर यांस मदत करायची आहे, असा खोटा संदेश दिला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांच्या  सतर्कतेमुळे हा प्रकार  उघडकीस आला.

पाटील यांनी माजी सभापती दत्ताजी नीलकंठ पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर अशा प्रकारचे फोन या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना करण्यात आल्याचे आढळून आले आहे.  फेक कॉलर अॅपवरून माझा मोबाईल क्रमांक हॅक करून हा खोडसळपणा करण्यात आला आहे.  या खोडसाळपणाचा निषेध करतो. कार्यकर्ते आणि मतदारांनी या खोडसाळपणावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.  दरम्यान,  इस्लामपूर पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.