‘चूक एकाची शिक्षा तिघांना’; दारू पिऊन स्कॉर्पिओची सेलेरिओ कारला धडक आणि…

0
281

चाकण, दि. २७ (पीसीबी) – पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे एका भरधाव वेगात जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारने सेलेरिओ कारला जोरात धडक दिली. तसेच स्कॉर्पिओची एका कंटेनरलाही धडक बसली. या अपघातात सेलेरिओ कार मधील तिघांचा मृत्यू झाला. तर स्कॉर्पिओ मधील चालक आणि सहप्रवासी असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 26) दुपारी घडली.

प्रफुल्ल संपत सोनवणे (वय 26), अक्षय मारुती सोनवणे (वय 24, दोघे रा. वाकी खुर्द, ता खेड), अविनाश रोहिदास आरगडे (वय 27, रा. कडूस, ता खेड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सुरेश मारुती कदम (वय 46), तुकाराम गोविंद परतापे (वय 58, दोघे रा. पुनावळे) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत महिला पोलीस नाईक स्मिता गाढवे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्कॉर्पिओ कार चालक सुरेश कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश कदम दारूच्या नशेत पुणे नाशिक महामार्गावरून स्कॉर्पिओ कार चालवत होता. चाकण येथील तळेगाव चौकात आल्यानंतर नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील सिग्नल लाल असतानाही आरोपीने त्याची स्कॉर्पिओ कार भरधाव वेगात चालवली. त्यावेळी सिग्नलच्या चौकातून तळेगाव बाजूकडे जात असलेली सेलेरिओ कार आणि एका कंटेनरला स्कॉर्पिओची जोरात धडक बसली. या अपघातात सेलेरिओ कार मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर स्कॉर्पिओ कार चालक आणि सहप्रवासी गंभीर जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.