चिमुकल्या हातांनी बनविल्या शाडूमातीच्या सुबक गणेश मूर्तीं; निगडी प्राधिकरणात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कार्यशाळा

0
368

निगडी, दि. ६ (पीसीबी) :भारतीय जनता पार्टी, निगडी प्राधिकरण विभाग आणि नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुलांनी आपल्या चिमुकल्या हातांनी आकर्षक, सुंदर आणि सुबक गणेशमूर्ती बनवत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला.

निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या बालभवनात 4 व 5 सप्टेंबर 2021 रोजी दोन दिवसांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये 25 पेक्षा जास्त लहान मुलांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत मुलांचे पालकही उपक्रमात सहभागी झाले. कार्यशाळेत मुलांना शाडूची माती, रंग व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यानुसार मुलांनी आकर्षक, सुबक अशा सुंदर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या. कार्यशाळेत सहभागी मुलांना नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुलांनी तयार केलेल्या मूर्तीची घरी प्राण प्रतिष्ठापना करून त्यांचे विसर्जन घरच्या घरी केले जाईल. यातून पर्यायवरण संवर्धनाचा संदेश देण्याचा हेतू असल्याचे नगरसेविका शर्मिला बाबर यांनी सांगितले. कार्यशाळेत नवनाथ मोरे, चेतन हिंगे यांनी मूर्ती बनिवण्यासाठी मार्गदर्शन केले. तर, राजेश कडू, प्रसाद जागळेकर, अजित कुटे, प्रवीण पाटील, विजय शिंकर, सचिन कुलकर्णी, आनंद देशमुख, माधुरी ओक, सागर सोनावले, नारायण पांडे यांनी संयोजन केले.