चिखलीत भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा दुर्देवी मृत्यू

0
1080

चिखली, दि. २६ (पीसीबी) – मागुन आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वार महिलेला दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.२५) सकाळी साडेदहाच्या सुमारास कुदळवाडी चिखली रोड येथे घडली.

मृणमयी सौरभ जोशी (वय २६, रा. चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मिलींद विष्णू कुलकर्णी (वय ४१, रा. सुयश अपार्टमेंट, फ्लॅट कॅ.३, भोईर कॉलनी, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, (एमएच/१४/व्ही/५४४३) या क्रमांकाच्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मृणमयी नेहमी प्रमाणे आपल्या दुचाकी (क्र. एमएच/१२/जीएक्स/२२४५)  वरुन तळवडे येथील कॅपजेमिनी कंपनीत कामाला निघाल्या होत्या. त्या चिखली कुदळवाडी येथे पोहचल्या असत्या (एमएच/१४/व्ही/५४४३) या ट्रक वरील अज्ञात चालकाने मृणमयी यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. तसेच ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी ट्रकचालक अद्याप फरार असून पोलीस उपनिरीक्षक सोलापूरे तपास करत आहेत.

दरम्यान, मृणमयी यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्या तळवडे येथील कॅपजेमिनी कंपनीत (Consultant) सल्लागार या पदावर कार्यरत होत्या. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.