चिंचवडमध्ये दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने वार

0
1836

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – दहशत माजवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकावर तिघा जणांनी कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवार (दि.१६) रात्री अकराच्या सुमारास चिंचवड दर्शननगरी समोरील हॉटेल खुशबुमध्ये घडली.

विजयकुमार परमानंद भोजवानी (वय ४९, रा. पंचनाथ कॉलनी, बी ब्लॉक, काळेवाडी) असे कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपक दत्ताराम कदम (वय २६, रा. शिवनेरी कॉलनी, श्रीनगर, रहाटणी), प्रणित नितीन पोटे (वय २३, रा. सुख निवास, जीवननगर, धोक कॉलनी, चिंचवड) या दोघांना अटक केली असून त्यांच्या एका १६ वर्षीय अल्पवयीन साथीदाराला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार भोजवानी यांचे चिंचवडमध्ये खुशबु नावाचे हॉटेल आहे. रविवार रात्री अकराच्या सुमारास ते हॉटेलवर असताना आरोपी दिपक, प्रणित आणि त्यांचा अल्पवयीन साथीदार हे तिघेही हॉटेलात आले. आणि दहशत माजवण्याच्या उद्देशाने विजयकुमार यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात या तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रणित आणि दिपक या दोघांना अटक केली असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराची बाल सुधार गृहात रवाणगी करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक आटवे तपास करत आहेत.