चार मुलांनी दाखवलेल्या धाडसामुळे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

0
842

उत्तर प्रदेश, दि.२७ (पीसीबी) –  उत्तर प्रदेशात चार मुलांनी दाखवलेल्या धाडसामुळे पोलिसांनी ५५ वर्षीय भिकाऱ्याला अटक केली असून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. चारही मुलांनी आरोपीच्या तावडीतून पळ काढला आणि पोलिसांना सगळी माहिती दिली. यामध्ये दोन मुली आणि दोन मुलं असून त्यांचं वय १४ ते १६ वर्ष आहे. या अल्पवयीन मुलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे भिकारी असल्याचं नाटक करणाऱ्या विजय भाद्रीचा पर्दाफाश झाला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय आधी मुलांचा विश्वास जिंकायचा आणि नंतर त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलायचा. मुलांचा विश्वास जिंकण्यासाठी तो त्यांना जेवण आणि कपडे देत असे. मुलांनी सांगितल्यानुसार, आरोपी जेवणात अनेकदा गुंगीचं औषध मिसळायचा. यानंतर जखमी करत असे आणि तेच रक्त आपल्या पायावर लावलेल्या खोट्या पट्टीवर लावून घ्यायचा जेणेकरुन लोकांची सहानूभुती मिळेल.

ही मुलं बाराबंकी ट्रेनमध्ये असताना आरपीएफ जवानांना सापडली. आरपीएफ जवान गस्त घालत असताना त्यांना संशय आला आणि मुलांची विचारपूस केली. मुलांनी दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांनी आरोपी विजयला त्याच्या घऱातून अटक केली. पोलीस सध्या त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहे. त्यांची संख्या तीन ते १५ पर्यंत असेल असा पोलिसांना संशय आहे.

सर्व मुलांना सध्या राज्य सरकारच्या वसतीगृहात ठेवण्यात आलं आहे. दोन्ही मुली आणि एक मुलगा लखनऊचा असून एक मुलगा बाराबंकीचा आहे. मुलांनी आपण आरोपीसाठी अनेक गोष्टी मोबाइल, पाकिटं आणि ई-रिक्षाच्या बॅटरी चोरल्याची कबुली दिली आहे. मुलींना ग्राहकांना समाधानी ठेवा अशी सक्ती दिली जायची. कधी तर एकापेक्षा जास्त ग्राहक असायचे. या बदल्यात त्यांना १५० ते ५०० रुपये दिले जायचे.

आरोपी मुलांना झोपडपट्टीत खाली जमिनीवर झोपायला द्यायचा. जेवणासाठी मुलांन दिवसाला १०० रुपये दिले जायचे. मुलं जे काही चोरतील किंवा भीक मागून पैसे मिळतील ते सर्व आरोपी स्वत:कडे ठेवायचा. मुलांनी अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे १४ ते १५ सहकारी त्यांना पकडून मारहाण करत. पण यावेळी मुलांनी जवळपास ७० रुपये वाचवले आणि ट्रेनचं तिकीट विकत घेतलं. सगळे झोपले असताना संधी साधत मुलांनी पळ काढला अशी माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली आहे.

अटक झाल्यानंतर आरोपी विजयने गुन्हा कबूल केला असून आपण सेक्स रॅकेट चालवत होतो आणि त्यासाठी तीन ते चार जणांची मदत मिळत होती असं सांगितलं आहे. आरपीएफ पोलीस निरीक्षक एम के खान यांनी सांगितल्यानुसार, “एका अपघातात पाय गेल्यानंतर आरोपीने भीक मागण्यास सुरुवात केली होती. पण  नंतर त्याने झोपडपट्टीतील मुलांना जेवण, कपडे आणि पैशांच अमिष दाखवत देहविक्री आणि चोरीसाठी वापर करण्यास सुरुवात केली”.