चारित्र्यावर संशय घेऊन केलेल्या मारहाणीत विवाहितेचा गर्भपात

0
330

चिंचवड, दि.४ (पीसीबी) – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती गर्भवती असताना तिच्या पोटावर लाथ मारून तिचा गर्भपात केला. तसेच विवाहितेच्या लग्नात माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांचा मानपान केला नसल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याची फिर्याद विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात दिली आहे.

पती अक्षय बाळू कांबळे, सासू, नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2020 पासून 3 मार्च 2021 या कालावधीत वेताळनगर, चिंचवड येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या लग्नानंतर आरोपींनी ‘तुझ्या घरच्यांनी लग्नामध्ये आमचा मानसन्मान केला नाही. तसेच तू भिकारी आहेस’ असे म्हणून विवाहितेला वारंवार शिवीगाळ व मारहाण केली. 12 फेब्रुवारी रोजी पती अक्षय याने एका अनोळखी महिलेला घरी आणले. ‘या महिलेला मी घरात घेणार आहे’ असे म्हटल्याने विवाहितेने पतीला विरोध केला. त्यावरून पतीने विवाहितेला मारहाण केली. त्यानंतर ‘तुझ्या पोटातील बाळ हे माझे नाही’ असे म्हणून विवाहितेच्या पोटावर जोरात लाथ मारली. त्यात विवाहितेचा गर्भपात झाला. ‘आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्यास तुला व तुझ्या घरच्यांना पाहून घेईन’ अशी धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.