चाकणमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरला जबर मारहाण करुन लुटले

0
861

चाकण, दि. १८ (पीसीबी) – ट्रक चालक आणि क्लिनरला तिघा जणांनी मिळून जबर मारहाण करत त्यांच्याजवळील एकूण ५२ हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. ही घटना रविवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील शेलपिंपळगाव येथे घडली.

याप्रकरणी ट्रक चालक संदीप विष्णू फावडे (वय २२, रा. गणेश नगर, वाघोली, ता. हवेली. मूळ रा. सारूळा, ता. औसा, जि. लातूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश दगडू वाडेकर (वय 23, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप आणि त्यांच्या ट्रकवरील क्लिनर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास शेलपिंपळगाव येथून शिक्रापूरकडे जात होते. ते मोरया हॉटेलच्या समोर आले असता आरोपी आकाश आणि त्याचे दोन साथीदारांनी मिळून संदीप यांचा ट्रक अडवला.  तसेच संदीप आणि त्यांच्या क्लीनरला डोक्यात, हातापायावर आणि पाठीवर गंभीर दुखापत केली. त्यानंतर संदीप यांच्याजवळील ४० हजार रुपये रोख आणि एक मोबाईल असा एकूण ५२ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आकाश याला अटक केली आहे. तर त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तपास करत आहेत.