चाकणमध्ये टेम्पोसहीत १४ लाखांचा गुटखा जप्त; आरोपी अटकेत

0
854

चाकण, दि. ३ (पीसीबी) – चाकण येथील मेदनकरवाडीतील गोडाऊनवर छापा टाकून गुन्हे शाखा युनेट १ च्या पोलिसांनी दोन टेम्पोसहित एकूण १४ लाख २४ हजार ३३७ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.२) रात्रीच्या सुमारास करण्यात आली.

अंकित सुनिल गुप्ता (वय २८, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा तस्कराचे नाव आहे. त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलिसांना त्यांच्या खबऱ्या मार्फत माहिती मिळाली कि, अंकित गुप्ता नावाचा इसम हा मेदनकरवाडी, चाकण येथे राहत असून तो त्यांच्या टेम्पोमधून गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करत आहे. यावर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि स्टाफला बोलवून याबाबत माहिती दिली आणि मेदनकरवाडी येथे सापळा रचून आरोपी गुटखा तस्कर अंकित याला दोन टेम्पो गुटख्यासह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी आणखी गुटखा मेदनकरवाडी येथील खंडोबा मंदिराच्याजवळील दत्ता भुजबळ यांच्या बिल्डींगमधल्या गोडाऊन मध्ये ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. यावर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी देखील धाड टाकून गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. अशा प्रकारे गुटख्याने भरलेले दोन टेम्पो आणि गोडाऊन मधील गुटखा असा एकूण १४ लाख २४ हजार ३३७ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करुन आरोपी अंकित याला अटक केली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहायक पोलिस फौजदार रमेश काळे, पोलीस हवालदार अजय भोसले, किरण लांडगे, दिपक खरात, प्रमोद वेताळ, पोलीस नाईक सचिन उगले, अमित गायकवाड, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रवीण पाटील, स्वप्निल शिंदे यांच्या पथकाने केली.