चाकणमध्ये गँगवॉर; सराईत गुंडावर गोळीबार करुन कोयत्याने वार

0
877

चाकण, दि. २८ (पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून दहा ते पंधरा जणांच्या सराईत टोळक्यांनी एका सराईत गुंडावर गोळीबार करुन कोयत्याने वार केले. ही घटना सोमवार (दि.२७) रात्री अकराच्या सुमारास चाकण खंडोबा माळ, आबु बकर मशिदीच्या पाठीमागे घडली.

संकेत रमेश गाडेकर (वय २०, रा. खंडोबा माळ, चाकण) असे पायाला गोळी लागून तसेच कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात सोन्या अवताडे, सोन्या आगरकर, रोहन घोगरे, मोनेश घोगरे, प्रतीक सोनवणे, विवेक कुऱ्हाडे, राहुल माने, रवि कळसकर, प्रशांत दातार, स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे आणि इतर चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकराच्या सुमारास जखमी संकेत हा मित्रांसोबत खंडोबा माळ येथे गप्पा मारत बसला होता. यावेळी वरील सराईत टोळी हातात कोयता, बंदुक आणि काठ्या घेऊन आले. सोन्याने  संकेतवर दोन गोळ्या झाडल्या यातील एक त्याच्या पायाला लागली. तर राहुल माने याने संकेतवर कोयत्याने वार केले. या घटनेत संकेत गंभीर जखमी झाला. तसेच हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तर इतरांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेतील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.