घोटाळे करणाऱ्यांना भगव्याला हात लावण्याचा अधिकार नाही; विनोद तावडेंचा अजित पवारांवर निशाणा

0
493

मुंबई, दि. २४ (पीसीबी) –  ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश  उच्च न्यायालयाने  दिले आहेत, त्यांना भगव्याला हात लावण्याचा अधिकार नाही, असा घणाघाती निशाणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर साधला.   

राष्ट्रवादी  पक्ष आता या पुढे दोन झेंडे वापरणार आहे.  पक्षाच्या सर्व कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्या बरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा असेल, अशी घोषणा  अजित पवार यांनी परभणीतील पाथरीमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेत केली होती. या घोषणेचा विनोद तावडे यांनी  खरपूस समाचार घेतला.

तावडे  म्हणाले की,  अजितदादा तुमच्याकडे एक झेंडा आहे, त्याचा दंडा पकडायला माणसे नाहीत. तो झेंडा कोण घेणार खांद्यावर? तुमचे पक्षाचे मंडळी सोडून चालली आहेत, मग झेंडा झेंडा काय करता? छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा घेऊन चालत नाही तर शिवाजी महाराजांनी जे शिकवलं आहे, ते अंमलात आणणार आहोत का?

रयतेला न लुटता रयतेला घडवणं हे महाराजांनी केले. आपल्या काळात किती घोटाळे झाले, आपण रयतेच आपण काय केले हे विसरू नका. झेंडा मानाने, प्रेमाने, खंबीरपणे त्याचा दंडा पकडणारा कार्यकर्ता हा उभा राहिला पाहिजे. जो तुमच्या सगळ्या नेत्यांना बघून पळत सुटला आहे आणि नेतेही पळत सुटले आहेत, अशा शब्दांत तावडे यांनी पवारांना सुनावले.