घरात थेट वीजचोरी अन् जनमित्रास मारहाण करणारा कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

0
285

पुणे, दि. १३ (पीसीबी) : वीजखांबावरून घरासाठी २१ हजार रुपयांची थेट वीजचोरी करणाऱ्या व ही चोरी उघड करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञासोबत मारपीट करणाऱ्या सुनील जाधव या कंत्राटी कर्मचाऱ्यास महावितरणच्या सेवेतून मंगळवारी (दि. १२) बडतर्फ करण्यात आले आहे. यासोबतच जाधव विरुद्ध वीजचोरी केल्याप्रकरणी कलम १३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मंचर विभाग अंतर्गत नारायण उपविभागमध्ये कार्यरत कंत्राटी (आऊटसोर्स) कर्मचारी सुनील भाऊ जाधव याच्या मु. पो. नंबरवाडी वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील राहते घरी नारायणगावचे सहायक अभियंता ऋषिकेश बनसोडे व वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास बांबळे यांनी वीजयंत्रणेची तपासणी केली असता त्या ठिकाणी वीजखांबावरून केबलद्वारे थेट वीजचोरी सुरु असल्याचे आढळून आले. पंचनामा केल्यानंतर कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव याने राहत्या घरी गेल्या २४ महिन्यांपासून एकूण १७५२ युनिटची म्हणजे १९ हजार १३० रुपयांची वीजचोरी केल्याचे निर्दशनास आले. वीजचोरी व दंडासह एकूण २१ हजार १३० रुपयांचे वीजबिल घराचे मूळ मालक यांना देण्यात आले आहे. या वीजचोरी प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात सुनील जाधव विरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घरातील वीजचोरी उघडकीस आल्यानंतर कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव याने महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास बांबळे यांच्यासोबत नारायणगाव येथे मारपीट केली व गंभीर स्वरुपाचे सार्वजनिक गैरवर्तन केले. त्यामुळे प्राईमवन वर्कफोर्स कंत्राटदार संस्थेकडून कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव विरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जाधव याची महावितरणमधील कंत्राटी सेवा देखील तात्काळ समाप्त झाली आहे.