ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आज, नेत्याची परीक्षा

0
136

मुंबई, दि.५ (पीसीबी) – राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजेच, आज मतदान होणार आहे.

आज निवडणुकांसाठी मतदान, किती वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार?
राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी म्हणजे 6 नोव्हेंबरला होईल.

गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.

ग्रामपंचायतीसाठी नेत्यांचं मतदान
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात अजित पवारांचे कुटुंब ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. सुनेत्रा पवार सकाळी 7.30 वाजता काटेवाडीत मतदान करतील. स्वःत अजित पवार मात्र तब्येत ठीक नसल्यानं मतदानाला येणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात निरगुडसर गावात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील मतदान करणार आहेत. तर खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव गावात अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते मतदान करतील. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायतीत मतदान असुनही तब्येतीच्या कारणास्तव खासदार अमोल कोल्हे मतदान करणार नसल्याची माहिती मिळत आहे. याव्यतिरिक्त जळगावात मंत्री गुलाबराव पाटील पाळधी खुर्द गावात मतदान करणार आहेत, तर पंढरपुरातील सांगोल्यात महूद गावात शहाजी बापू पाटील मतदान करतील

पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका का रखडल्या?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, त्यापूर्वी 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यामुळे अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावं, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. त्याच प्रमाणे, महाविकास आघाडी काळात तयार करण्यात आलेली वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला होता. या नव्या वॉर्ड रचनेलाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व
निवडणूक आयोगानं जाहीर केलेली ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका मानलं जातं. पण आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे? हे या निवडणुकांमधून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. देशपातळीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपच्या गोटात दररोज बैठकांचं सत्र सुरु आहे. विरोधी पक्षाच्या आघाडीनेही भाजपविरोधात कंबर कसली आहे, त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.