गौरव, दीपक ब्रॉंझपदकापासून वंचित

0
329

पुणे, दि.१९ (पीसीबी) : करोनाच्या संकटामुळे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा रद्द करून आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक विश्वकरंडक स्पर्धेत भारताची कामगिरी अपयशी राहिली. महिला गटात अंशु मलिक हिने मिळविलेल्या रौप्यपदकावरच त्यांना समाधान मानावे लागले. ही स्पर्धा सर्बियामध्ये बेलग्रेड येथे पार पडली. या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी आज भारताच्या दीपक पूनिया (८६ किलो) आणि गौरव बालियान (७९ किलो) यांना ब्रॉंझपदकाची संधी होती. मात्र, दोघांनाही या संधीचा फायदा उठवता आला नाही. त्यामुळे त्यांना ब्रॉंझपदकापासून वंचित रहावे लागले.

ब्रॉंझपदकाच्या लढतीत गौरव बालियनला बल्गेरियाच्या ताकदवा महामेदखाबीब काझीमहामेदौ याचे आव्हान पेलवले नाही. पहिल्या फेरीतच दोनदा सलग चार गुणांची कमाई करत महामेदखाबीब याने तांत्रिक गुणांवर गौरववर १४-१ असा विजय मिळवून ब्रॉझपदक मिळविले.

दीपकलाही ८६ किलो वजनी गटात ब्रॉंझपदकाची कमाई करण्यात अपयश आले. त्याला मोल्डोवाच्या पीओर इआनुलोव याच्याकडून ४-१ असा पराभव पत्करावा लागला. ब्रॉंझ पदकासाठी झालेली ही लढत खूपच बचावात्मक खेळली गेली. सुरवातीला निष्क्रियतेसाठी इआनुलोव याला ३० सेकंदात गुण मिळविण्याची तांत्रिक ताकिद मिळाली. यात त्याने दीपकला मैदानाबाहेर नेत एका गुणाची कमाई केली. पहिली फेरी त्याने १-० अशी जिंकली. दुसऱ्या फेरीत दीपकला पॅसिविटी (तांत्रिक ताकिद) मिळाली. दीपक या ३० सेकंदात गुण मिळविण्यात अपयशी ठरला. त्यामुळे इआनुलोव याला दुसरा गुण आयताच मिळाला. लढतीत दुसऱ्यांदा मिळालेल्या पॅसिविटीवर इआनुलोव याला गुण मिळविण्यात अपयश आल्याने दीपकचे खाते उघडले. त्यानंतरही अखेरच्या काही सेकंदाला संधी असताना दीपक काहिसा थकलेला वाटला आणि याचा फायदा घेत लढत संपण्यास काही सेकंद असताना इआनुलोव याने दोन ताबा गुण मिळवून ४-१ अशा विजयासह ब्रॉंझपदक पटकावले.

त्यापूर्वी, ७९ किलो वजनी गटात भारताच्या गौरव बालियानने जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करताना आपले वर्चस्व राखरे होते. त्याने उपांत्यपूर्व फेरीत सर्वाधिक गुणांच्या झालेल्या लढतीत इटलीच्या अॅरॉन कॅनेवा याला ७-० असे पराभूत केले. अर्थात, अंतिम गुण फलक १७-१० असा होता. पण, हे सातत्य त्याला उपांत्य फेरीत टिकवता आले नाही. रशियाच्या अखमेद उस्मानोव याच्याकडून तो १०-० असा हरला. मात्र, त्याला ब्रॉंझपदकाची लढत खेळण्याची संधी मिळाली. भारताच्याच दीपक पूनिया देखील आपली आगेकूच उपांत्य फेरीत कायम राखू शकला नाही. त्याला उपांत्य फेरीत रशियाच्या दौरन कुरुग्लिएव याच्याकडून ४-० असा पराभव पत्करावा लागला. त्या आधी त्याने लिथुआनियाच्या इवार्स सॅमुसोनोकोस आणि २०१८ युरोपियन स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेत्या उरी कलाशिनीकोव याला हरवून आपली आगेकूच सुरू केली होती.