गुरुवारी बत्तिसावी श्रम – उद्योग परिषद

0
198

पिंपरी,दि. १५ (पीसीबी) आंतरराष्ट्रीय कामगारदिन आणि महाराष्ट्र राज्य स्थापनादिन यांचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता एक दिवसीय बत्तिसाव्या श्रम – उद्योग परिषदेचे ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे महामार्ग, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, कष्टकरी संघर्ष महासंघ – महाराष्ट्र आणि आशिया मानवशक्ती विकास संस्था आयोजित श्रम – उद्योग परिषदेचे उद्घाटन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस आणि कामगार कायद्याचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक चंदन कुमार यांच्या हस्ते करण्यात येणार असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे कार्यवाह उद्धव कानडे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत.

मुव्हटेक कन्व्हेअर्स प्रायव्हेट लिमिटेड (महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार २०२३), प्रगती प्रेस टूल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (भारतरत्न गुलझारीलाल नंदा औद्योगिक सुरक्षितता पुरस्कार), एस. के. एफ. बेअरिंग इंडिया एम्प्लॉईज युनियन (कामगार हितसंवर्धन कामगार संघटना पुरस्कार) या आस्थापनांना प्रदान करण्यात येतील. मुरलीधर दळवी, शरद काणेकर, राजू जाधव यांना (श्रमसारथी सन्मान २०२३) ने सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर नीलेश भोसले (स्मशानभूमी सेवक), महादेव माने (गटई मजूर), तानाबाई मोहिते (मोलकरीण), महेशकुमार रामशरण राम (पीठगिरणी मजूर), बालाजी लोखंडे (हातगाडीधारक), सुषमा सुतार (घरेलू मजूर), मिहीर चव्हाण (शवविच्छेदक मजूर), महादेव गायकवाड (बांधकाम मजूर) आणि प्रमिला कुदळे (भाजीपाला विक्रेत्या) या उपेक्षित कष्टकऱ्यांचा सत्कार करण्यात येईल; तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मीरज येथे१७व्या कामगार साहित्य परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याप्रीत्यर्थ रविराज इळवे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

विनाशुल्क असलेल्या या परिषदेचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदाम भोरे व आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव सातपुते यांनी केले आहे.