‘गद्दारी तर सगळ्यांनी समान केली, मग मंत्रीपद दोघांच का’? – काँग्रेस

0
391

 

भोपाळ, दि.२३ (पीसीबी) – मध्य प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभरानंतर शिवराजसिंह चौहान सरकारमध्ये मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं आहे. मंगळवारी नरोत्तम मिश्रा, कमल पटेल, मीना सिंह, तुलसी सिलावत आणि गोविंदसिंग राजपूत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आतापर्यंत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे राज्यातील सत्तेत एकटे होते. पण आज अखेर इतर मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ५ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल लालजी टंडन यांनी राजभवन इथे झालेल्या साध्या सोहळ्यात शिवराज कॅबिनेटच्या मंत्र्यांना शपथ दिली. कार्यक्रमादरम्यान कोरोनामुळे सामाजिक अंतर आणि इतर खबरदारीच्या उपायांची काळजी घेतली गेली होती.

ज्योतिरादित्य यांच्यामुळे सरकार आले असले तरी शिंदे घराण्यातील कोणालाही मंत्री न करण्याची काळजी चौहान यांनी घेतल्याची चर्चाही मध्यप्रदेशात आहे. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या ज्योतिरादित्य यांनी आपल्या समर्थक माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्री करण्याची मागणीही भाजपकडे केली होती. मात्र आज चौहान यांनी मंत्रिमंडळात आणखी पाचजणांचा समावेश केला. त्यामध्ये शिंदे गटाचे तुलशीराम सिलावट आणि गोविंदसिंह राजपूत यांचा समावेश केला तर अन्य तीनजण चौहान यांचे समर्थक आहेत.

यावर आता कॉंग्रेसने जोरदार निशाना साधत पक्षातून फुटलेल्या आमदारांना लक्ष केले आहे. ‘गद्दारी तर सगळ्यांनी समान केली, मग मंत्रीपद दोघांच का’? अशी टीका मध्य प्रदेश कॉंग्रेसने केली आहे.