गणेश नाईकांसोबत भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा नकार

0
454

नवी मुंबई, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे सुपूत्र संदीप नाईक यांनी नुकताच भाजपमध्ये  प्रवेश केला. तर गणेश नाईक येत्या काही दिवसांत प्रवेश करणार  असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे  ५२  नगरसेवक भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.  मात्र, आता २५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीतच  राहण्याचा ठाम  निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीतील नगरसेवकांना भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या घरी पक्षाची बैठक झाली. यावेळी  आमदार दिलीप वळसे-पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत  झालेल्या बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी २५ नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला .

दरम्यान, २५ निष्ठावान नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये राहणार आहेत. जे सोबत येतील ते व जे सोबत येणार नाही त्यांच्याशिवाय नवी कार्यकारिणी नियुक्त करण्याची विनंती अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करणार आहे, असे माजी उपमहापौर व  नगरसेवक अशोक गावडे यांनी सांगितले.