गणेशोत्सवासाठी पोलिसांनी केलेल्या नियमावलीनुसार ही आहेत बंधने…

0
382

पुणे, दि. १७ (पीसीबी): पुण्यातील गणेशोत्सवासाठी पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. यामध्ये मूर्ती खरेदी करणे, गणेश आगमन ते प्रतिष्ठापना यासर्वांबाबत नियम घालून देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासाठी हे नवे नियम जारी केले आहेत. पुणे शहरा प्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातही जवळपास तेच नियम आणि बंधने असणार आहेत.

गणेश मूर्तीची खरेदी ऑनलाईन
गणेशोत्सव मंडळांनी मूर्तींची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी. मनपा क्षेत्रीय कार्यालयात शाळांची पटांगण, मोकळ्या जागांवर मूर्ती विक्रीकराता परवानगी दिली जाईल. मात्र, रस्ता, पदपथांवर परवानगी दिली जाणार नाही.

मिरवणुकीवर बंदी
श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी धार्मिक विधीसाठी कमीत कमी नागरिकांनी एकत्र यावं, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.

श्री गणेश प्रतिष्ठापना मंदिरातच
ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंदिरे आहेत, त्यांनी प्रतिष्ठापना मंदिरात करावी. अन्यथा नियम आणि अटी पाळून मंडळात छोटे मंडप करिता परवानगी दिली जाईल. पुण्यातील गणेश मंडळांनी मंदिरं नसलेल्या मंडळांना गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर पुणे पोलिसांनी मंदिरं नसलेल्या मंडळांना छोटे मंडप उभारण्यास परवानगी दिली जाईल, असं सांगितलं आहे.

गणेश मूर्तीची उंची
सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती चार फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट मर्यादित असावी.

पीएमपीएल बस सेवा सुरु होणार
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे तब्बल 5 महिन्यांनंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार आहे. 22 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन आणि पीएमपीएलच्या या निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांना दळणवळणात मोठी मदत होणार आहे.