`ख्वाडा`,`बबन` या दर्जेदार चित्रपटानंतर `TDM` सारख्या उत्तम चित्रपटाला थिएटर मिळेना, कलाकारांच्या डोळ्यात पाणी

0
253

मुंबई, दि. २ (पीसीबी) : ‘ख्वाडा’,’बबन’ या दर्जेदार सिनेमांनंतर आता भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता या पुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.

मराठी सिनेमा संपवला जात आहे : भाऊराव कऱ्हाडे
भाऊराव कऱ्हाडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत,”टीडीएम’ हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे आणि सिनेप्रेमी हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मात्र सिनेमागृहात शो नसल्या कारणाने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही”. माझा सिनेमा आवडला नसेल तर लोकांनी तसं स्पष्ट सांगावं. तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस. त्या दिवशी मी सिनेमा करण्याचं बंद करेन, असं म्हणताना भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले आहेत.

भाऊराव कऱ्हाडे पुढे म्हणाले,”आमचा सिनेमा चांगला आहे असं मी म्हणत नाही. पण या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना शो रद्द करणं कितपत योग्य आहे. पिंपरी चिंडवडमध्ये या सिनेमाचे दोन शो होते. सिनेमागृह तुडुंब भरलेलं असतानाही शो वाढवून दिला नाही. हा सिनेमा पाहण्याची प्रेक्षक मागणी करत होते. त्यामुळे मी त्या थिएटर मालकांकडे विचारपूर केली. त्यांनी मला सांगितलं की,या सिनेमाचा एकच शो लावण्याचं वरुन प्रेशर आहे. माझ्या सिनेमाला मिळालेले शो प्राइम टाइममधील नसून ऑड टाइममधील आहेत. या सर्व गोष्टींचा मला सिनेमाच्या टीमला खूप त्रास होत आहे”.

माझ्या सिनेमाला तुम्हीच न्याय मिळवून द्या, हात जोडत अभिनेत्याने प्रेक्षकांना केली विनंती
भाऊराव कऱ्हाडे नेहमी नवोदित कलाकारांना घेऊन सिनेमा बनवण्याचं धाडस करत असतात. ‘टीडीएम’ (TDM) या सिनेमातील अभिनेता पृथ्वीराज थोरातनेदेखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. तो म्हणाला,”मायबाप प्रेक्षकांना टीडीएम सिनेमा पाहायला आहे. मराठी सिनेमा पुढे यायला हवा. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. या क्षेत्रातील जाणकारांकडून आम्ही काय आदर्श घ्यावा? आम्ही खरचं कामं करावी की नाही. महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा हा सिनेमा पाहा आणि आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की कळवा”. हात जोडत त्याने प्रेक्षकांना विनंती केली आहे की,”माझ्या सिनेमाला तुम्हीच न्याय मिळवून द्या”.

‘टीडीएम’ हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण या सिनेमाला शो मिळत नसल्याने दिग्दर्शकासह कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. मराठी सिनेमांना स्क्रीन न मिळणं हे मुद्दा जुना आहे. आजवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी स्क्रीन मिळण्यासाठी आवाज उठवला आहे. पण अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.