खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा उद्या पिंपरी-चिंचवड दौरा

0
634

भोसरी, दि. ३१ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे उद्या पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रश्नावर ते आयुक्तांबरोबर तासभर बैठक घेणार असून आजी,माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत.

पालिका मुख्यालयात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर कोल्हे यांची सायंकाळी चार वाजता बैठक होणार आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तिकर, रेडझोन, कचरा समस्या, पुण्याचा कचरा मोशीत टाकण्याचा प्रकार, नाशिकफाटा ते मोशीदरम्यानचे पुणे नाशिक महामार्गाचे सहापदरी रस्तारूंदीकरण, भोसरीचे रुग्णालय यासह इतर स्थानिक मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. पाच वाजता ते पत्रकारांना भेटतील. तर, सहा वाजता पक्षाच्या शहर कार्यालयात पक्षाचे आजी,माजी नगरसेवक,पदाधिकारी आणि संघटनांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, भोसरी विधानसभा मतदार संघातून ३१ हजाराने पिछाडीवर राहिले म्हणून विजयानंतर ते लगेच भोसरीत आले नाहीत. विजयानंतर कोल्हे यांनी हडपसर येथे संपर्क कार्यालय सुरु केले. मात्र, भोसरीत ते आले नसल्याची तक्रार अशी तक्रार थेट अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान, माजी खासदार शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांचे भोसरीत कार्यालय होते. तेथे ते भोसरीकरांना दर गुरुवारी भेटत होते. या पार्श्वभूमीवर खासदार कोल्हे गुरुवारी शहरात येत आहेत. कोल्हे हे अभिनेतेही असून सध्या त्यांची धर्मरक्षक संभाजी ही मालिका सुरु आहे. तिचे शुटिंग आणि संसदेचे अधिवेशन एकाच वेळेस आल्याने भोसरीत लगेच यायला जमले नसल्याचा खुलासा कोल्हेंनी केला होता.