कोल्हापूर; करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घर बसल्या घेता येणार

0
448

कोल्हापूर, दि.२७ (पीसीबी) – करवीर निवासिनी महालक्ष्मीचे कोणत्याही क्षणी दर्शन देणारी स्वत:ची वाहिनी आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सुरू होणार आहे.

कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या (अंबाबाई) मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधल्याचे मानले जाते. कोल्हापूरची अंबाबाई ही अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरत असल्याने देवीच्या दर्शनासाठी बारमाही भक्तांची रीघ लागलेली असते. नवरात्रोत्सवात तर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. तरीही भाविकांची देवीच्या दर्शनाची तिचे पूजाविधी- सोहळे पाहण्याची आस कायम असते. ही गरज ओळखून देवस्थान समितीने देवीचे दर्शन देणारे एक ‘अ‍ॅप’ बनवले आहे. पण याच्याही पलीकडे नित्य दर्शन देण्यासाठी एका खासगी कंपनीच्या मदतीने लवकरच एका वाहिनीची सुरुवात होणार आहे. यामुळे मंदिरात सातत्याने चालणारे धार्मिक विधी, किरणोत्सव, रथोत्सव, प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची निघणारी मिरवणूक, चैत्र-अश्विन महिन्यातील उत्सव तसेच नवरात्र उत्सव काळात मंदिरात चालणारे भजन-कीर्तन, गायन आदी कार्यक्रम जगभरातील भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.