कोरोना सोबत यांचीपण दहशत वाढली

0
335

प्रतिनिधी,दि.१४ (पीसीबी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात गेल्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढत असून या वायरसमुळे दहशत निर्माण झाली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे विविध राज्यात वन्यजीव मानवी वस्तीत आल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अगदी कश्मीर पासून केरळ पर्यंत अनेक राज्यात मानवी वस्तींमध्ये झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात काही जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले व पाळीव प्राणी मारले गेले आहेत. बिबट्या सारखे हिंस्र वन्यप्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. लॉकडाऊन असल्याने शहरे ओस पडली आहेत. लॉकडाऊन काळात वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. नीलगाय, मोर सारखे प्राणी शहरात दिसू लागल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होऊ लागला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात काही जणांचा मृत्यू झाला व अनेक जण जखमी झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढू लागला आहे. मुंबईतील पावई येथील आयआयटी कॉलेज परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात बिबट्याने मानवी वस्तीमध्ये घुसून पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील एका विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला तर मंचर जवळ एका बिबिट्याला पकडण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. नगरजिल्ह्यात कान्हूरपठार शिवारात भक्ष्याचा पाठलाग करताना कोरड्या विहीरीत पडलेल्या बिबट्यास पारनेर वनविभाग, नगरच्या वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम व ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर जेरबंद केले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात तर बिबट्या एका घरातच जाऊन बसला. नाशिक जिल्ह्यात लॉकडाऊन काळात तर बिबट्यांनी धुमाकूळच घातला आहे. नाशिक रोड परिसरातील नामको हॉस्पिटल कॅम्पसमध्ये बुधवारी मध्यरात्री बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली. रुग्णालयाचे दरवाजे बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. पहिल्या मजल्यावर तैनात सुरक्षा रक्षकाने बिबट्या दिसताच अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने वनविभागासह पोलिसांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत बिबट्या फरार झाला. नाशिक मनपा हद्दीतील पिंपळगाव खांब येथे राहणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ जाधव यांच्या बंगल्याच्या परिसरात व शेजारच्या मळ्यात बिबट्याचा मुक्त संचार होता. गेल्या शनिवारी डॉ. जाधव यांच्या सीसीटिव्ही कॅमे-यात बिबट्या दिसला होता. १२ मेच्या मध्यरात्री नाशिकशहरात लॅमरोड येथील अनंत आरोग्यधाम या ठिकाणी रहिवाशी क्षेत्रात बिबट्याचा वावर दिसला होता. नाशिक मधील एकलहरे जवळील गंगापाडळी शिवारात बिबट्याने हल्ला केल्यामुळे बारा वर्षाच्या मुलाला ठार केले होते. तो बिबट्याही पकडण्यात आला होता. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोनवाडे गावातील तीन वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात मुलाचा मृत्यू झाला होता. नाशिकरोड, देवळाली कॅम्प, एकलहरे, गांधीनगर, विहीतगाव परिसरात लॉकदौंच्या काळात बिबट्याचा वावर वाढला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख परिसरातील इंजीनिअरिंग कॉलेज जवळ बिबट्याचा विद्युत तारांमध्ये अडकून मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात बिबट्याचा छावा वन अधिकाऱ्यांनी पकडला. बिबट्या सारखे हिंस्र वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये शिरू लागल्याने नागरिकांमध्ये कोरोना पाठोपाठ हिंस्र वन्यप्राण्याची दहशत निर्माण होऊ लागली आहे.

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात बिबट्या मानवी वस्त्यांमध्ये घुसू लागला आहे. कश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले. नैनितालमध्ये मानवी वस्तीत शिरलेला एक बिबट्या मृत्युमुखी पडला व शिमला मध्ये एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. पंजाब येथील संगरुर मध्ये बिबट्या दिसून आला. उत्तर गौहाटी आसाम, चंडीगड, उत्तर प्रदेशातील बिजनौर, लखनऊ, मथुरा, गुजरात राज्यातील गांधीनगर व भावनगर, मध्य प्रदेशातील राधोगड, हैद्राबाद शहर, बंगळूरू शहर, गोव्यातील वास्को परिसर ते केरळ पर्यंत अनेक भागात बिबट्या मानवी वस्तीत घुसला. काही ठिकाणी स्थानिक नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले व पाळीव प्राणी भक्ष्य ठरले. वास्तविक झपाट्याने झालेल्या नागरीकरणामुळे मानवाचे जंगलावरील अतिक्रमण, वृक्षतोडीमुळे नैसर्गिक अधिवासाचा होत असलेला ऱ्हास आणि महामार्ग बांधणीमुळे प्राण्याचा अधिवास कमी होत गेला आहे. लॉकडाऊन काळात मनुष्य आपल्याच घराच्या पिंजऱ्यात अडकल्याने वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढला आहे. मात्र कोरोणाच्या दहशतीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी आता हिंस्र वन्यप्रान्यांची दहशत वाटू लागली आहे.