कोरोना रुग्णाकडून बेडसाठी एक लाख रुपये घेण्याच्या आरोप प्रकऱणात स्पर्श हेल्थकेअर विरोधात महापालिकेची पोलिसांत तक्रार

0
250

पिंपरी, दि.१(पीसीबी) – कोरोनाग्रस्त रुग्णाकडून बेडसाठी स्पर्श हॉस्पिटलच्या संचलकांनी एक लाख रुपये घेतल्याच्या आरोपावरून पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत शुक्रवारी जोरदार हंगामा झाला होता. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्व पक्षीय नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांवर तुफान टीका केली आणि या प्रकरणात फौजदारी दाखल करण्याची मागणी केली होती. महापौर माई ढोरे यांनी या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पाटील यांना दिले होते. त्यानुसार आज दुपारी पिंपरी पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एक लाख रुपये घेतल्याच्या आरोपाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जात केली आहे. महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त आणि नगरसचिव उल्हास जगताप यांनी त्याबाबतची तक्रार दिली आहे.

तकआर अर्जात म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने ऑटोक्लस्टर येथे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. या ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरविण्याकामी ठेकेदारी पध्दतीने फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर प्रा. लि. या संस्थेची नेमणूक केली आहे. ३० एप्रिल रोजी महापालिका सभेत स्पर्श हेल्थकेअरबद्दल गंभीर स्वरुपाचे आरोप नगरसेवकांनी केले. रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये स्पर्श हेल्थकेअर मध्ये काम कऱणारे डॉ. प्रविण जाधव (कन्सलटंट) यांनी पद्मजा हॉस्पिटल कडून डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे यांचेसह स्विकारल्याचा आरोप महासभेत कऱण्यात आला आहे. चिखली गाव येथील श्रीमती सुरेखा अशोक वाबळे असे ऑटोक्लस्टर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्ण महिलेचे नाव आहे. या प्रकऱणातच अत्यंत गंभीर आरोप नगरसेवकांनी केले असल्याने आता त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे या तक्रार अर्जात म्हटले आहे.