कोरोना भाजपाला बुडवणार की तारणार ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
738

प्रसंग एक – उत्तर प्रदेश मधील एक व्हिडीओ नुकताच समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. तिथले एक भाजपा आमदार एका गावात जातात तेव्हा गावकरी घेराव टाकतात. कोरोना काळात तोंड दाखवले नाही म्हणून जाब विचारतात…एक दोघे नाही तर पाच सहा गावकरी आमदार महोदयांच्या अंगावर अक्षरशः खेकसतात… आता पुढच्यावेळी परत मत मागायला आलात तर लाठ्या काठ्यांनी बडवू… असा सज्जड दम देतात…गावकऱ्यांचा रोख पाहून आमदार काढता पाय घेतात…

प्रसंग दोन – पिंपरी चिंचवड मधील असाच एका सामान्य कार्यकर्त्याचा नगरसेवका बरोबरचा संवाद सुध्दा बोलका आहे. “कोरोना काळात कुठं दडून बसला व्हता…? साधा बेड पाहिजे म्हणून गावभर फिरलो… तुमचे कोणी मदतीला आले न्हाय…रेमडेसिवीर का काय ते इंजेक्शन पाहिजे तर १७ मेडिकल पालथी घातली…शेवटी काळ्या बाजारातून घेतले…आमचा शेजारी मेला तर त्याला मसणात न्यायला गाडी न्हाय… मसणात गेलो तर तिथंही जाळायलासुध्दा पैसे घेतलं… लेका हो कुठं कुठं खायचं त्याचा तरी विचार करा…“

प्रसंग तीन – कोरोना काळात महापालिकेन काय दिवे लावले हो…किती मदत केली… तिकडं तो पारनेर तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निलेश लंके बघा… स्वतःचा पैसा खर्च करून हजार लोकांची सोय केली म्हणे…तुम्हाला काय धाड भरली होती…स्मार्ट सिटी मधे लुटले…, कोरोनासाठी जंबो सेंटर उभे केले तिथे खा खा खाल्ले…, कोरोनाच्या निमित्ताने खरेदी जी खरेदी केली त्याल लाटले…राष्ट्रवादी नको म्हणून तुम्हाला मते दिली, पण तुम्ही त्यांचे बाप निघालात…एकाच माळेचे मणी…

मित्र हो, महापालिका निवडणुका अवघ्या नऊ महिन्यांवर (फेब्रुवारी २०२२) येऊन ठेपल्यात. पहिल्या कोरोना लाटेत टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले आणि लोकांनीही देश म्हणून साथ दिली, त्यात कसेबसे निभावले. दुसऱ्या कोरोना लाटेत लोकांचे अतोनात हाल झाले. आता जगण्यासाठी किमान लस मिळेल म्हटले तर तासन तास रांगेत उभे राहून तीसुध्दा मिळत नाही. कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. हजारो धंदे बुडाले. देशात दोन कोटींवर रोजगार बुडाला. सगळीकडे सन्नाटा. आता मोदी डोळ्यात पाणी आणतात, पण लोकांच्या डोळ्यात अंगार आहे. सप्टेबर, ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर मध्ये कोरोनाची तिसरी लाट महाभयंकर असेल म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेपासून वैद्यकीय क्षेत्रातील रथी महारथी सांगतात की, त्याचा सर्वात मोठा फटका भारताला बसू शकतो. लहान मुलाबाळांवर संक्रांत असेल. तोवर पूर्ण लसीकरण अशक्य आहे. त्यातच आता काळी बुरशी (म्यूकरमायकोसिस) चा अत्यंत वाईट रोग मागे लागलाय. पुण्यात २०० पेशंट सापडलेत. पिंपरीत किमान १५० आहेत. कोरोनाची ही महामारी आणखी काय काय चमत्कार दाखवेल माहित नाही. त्यात सत्ताधारी म्हणून किमान पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची परिक्षा आहे. राज्य सरकारकडे बोट दाखवून भागनार नाही, कारण लस कोणाच्या संमतीने मिळते, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन कुठून येते ते लोकांना किमान पेपरात वाचून चांगले कळते. गुजराथला किती मिळते आणि महाराष्ट्राला किती मिळते याचीही लोक तुलना करतात. कोरोना रुग्ण अथवा मृतांच्या आकडेवारीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असला तरी गुजराथमध्ये १३ हजार मृत दाखवले जातात, पण १ लाख २३ हजार मृतांचे दाखले वाटले. आकड्यांची लपवाछपवी दिव्य भास्कर या दैनिकाच्या गुजराथ आवृत्तीने उघड केली. तेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णतः अपयशी ठरल्याचा ठपका देशातील नाही तर विदेशातील तमाम माध्यमांनी ठेवला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या रोजच्या विधानातून भाजपा किती राजकारण करते तेसुध्दा सिध्द झाले. प्रश्न असा आहे की, अशा सर्व पार्श्वभूमिवर उद्याच्या महापालिका सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोक भाजपाला मते का देतील, याचा विचार भाजपाच्या नेत्यांनी करायची वेळ आली आहे.

उत्तर प्रदेशात एका भाजपा आमदाराला लोकांनी खदेडले, याचा आमचा काय संबंध असे पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्ते म्हणत असतील तर त्यांचे नशिब त्यांच्या बरोबर. पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचे कौतुक भाजपाच्यात युवा आमदार महाले ताई करतात. पिंपरी चिंचवडचे आमदार यातून काही शिकत नसतील तर त्यांचे भवितव्य त्यांच्या हाती. गाव चावडीवरच्या गप्पा म्हणजे शितावरून भाताची परिक्षा असते. त्यातूनही शहर भाजपा शिकणार नसेल तर भाजपाची आगामी महापालिकेतील सत्ता धोक्यात आहे, असे आताच समजा. भाऊ, दादा यांनी मनात आणले तर तिसऱ्या लाटेचे संकट हे संधीत रुपांतर करू शकतात. लोकसभा, विधानसभा निवडणुकिवर किमान २०-२५ कोटी खर्च करणारे आमदार, महापालिकेला वार्ड निवडणुकित किमान २-३ कोटी उधळणारे नगरसेवक ३० लाख लोकांना वाचविण्यासाठी सर्व काही करू शकतात. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ज्या पद्धतीने कोरोना सेवा केंद्र उभे केले, २४ तास तिथे तळ ठोकून स्वतः रुग्ण सेवा केली याचा डंका अक्षरशः देशभर झाला. लोकांनी भरभरून दान दिले, देश विदेशातून ३-४ कोटी रुपयेंची मदत थेट बँक खात्यात जमा झाली. इथे ५ -१० कोटी एका स्मार्ट सिटीतून दलाली घेणारे स्वतःच्या खाशातून पाच-दहा रुपये टाकत नाहीत याची खंत लोकांना आहे. लोक बोलत नाहीत, करून दाखवतात. महापालिका निवडणुकीला त्याचे प्रत्यंतर येईल. मात्र, तिसरी लाट हे संकट असले तरी आजवर झालेल्या चुकांतून शिकले आणि आगामी संकटावर मात कऱण्यासाठी आतापासून यंत्रणा कामाला लावली तर लोक नाव काढतील आणि पुन्हा भरभरून देतील. जे आमदार निलेश लंके यांनी केले त्याच्या शेकडो पटीत मोठे काम लक्ष्मण जगताप, महेश लांडगे हे आमदार करू शकतात. महापालिकेचा आणि करदात्यांचा एक पैसा न घेता हे कार्य उभे राहू शकते, ते कसे याचे मर्म त्यांनाच कळते. १०,१५,२५ लाख रुपये निवडणूक निधी गुप्तदान म्हणून देणारे किमान ५० वर बिल्डर शहरात आहेत. एक सत्कर्म म्हणून सामाजिक दायित्वाची भावना म्हणून लोकांचे जीव वाचविण्यासाठी आतापासून आराखडा तयार केलात आणि नियोजन केलेत तर महापालिका निवडणुकीसाठी एक रुपया खर्च न करता लोक पुन्हा भाजपाला सत्ता देतील. अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे चिरंजीव पार्थ पवार प्रतिष्ठानचे पार्थ हेसुध्दा त्यासाठी भक्कम आहेत, समर्थ आहेत. उत्तर प्रदेश मधील आमदार व्हायचे की पारनेरचे निलेश लंके होऊन नाव कमावायचे ते भाऊ, दादा तुम्हीच ठरवा. कोरनामुळे आता गणपती, नवराभत्री, दहिहंडी, डॉ. आंबेकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती अशी कुठलीही वर्गणी नाही. दिवाळीला मतदारांना ना पणत्या वाटाच्या ना उटणे. ग्लोबल टेंडर काढून शहरात मोफत लसीकरणाची घोषणा केली, असंघटीत कष्टकऱ्यांना ३ हजार रुपये मदत द्यायची वल्गना केलीत. प्रत्यक्षात यातले काहीच साकराले नाही तर त्याचा उलट परिणामही होऊ शकतो. कोरोना भाजपाला बुडवणार की तारणार ते आता वरती मोदींच्या आणि शहरात भाऊ, दादांच्या हातात आहे. घोडेमैदान जवळ आहे.