कोरोना च्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्यास सोडणार नाही – राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अण्णा बनसोडे यांचा इशारा

0
588

पिंपरी, दि. १२: (पीसीबी) – कोरोनासाठी आवश्यक निधी कमी पडणार नाही, परंतू कोरोना साथीच्या वेळी होणाऱ्या खर्चामध्ये भ्रष्टाचार झाल्यास कोणत्याही आणि कितीही उच्च पदस्थ अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास आज आ. बनसोडे यांनी भेट दिली. परिचारिका दिना निमित्ताने त्यांनी परिचारिकांचे प्रश्न समजून घेतले. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, अभिमान भोसले व रुग्णालयाच्या अधिसेविका आणि मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होत्या.

परिचारिकांनी काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढाच आमदारांसमोर मांडला असता, आ. बनसोडे यांनी रुग्णालयाची सुरक्षा, कर्मचाऱ्यांना संरक्षण, वेतन वाढ, पदोन्नती आदी प्रश्ना सोडविण्यासाठी तातडीने मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

कोविड 19 वार्ड मध्ये काम करणाऱ्या परिचारिकांशी चर्चा केली व त्यांचे मनोबल वाढविले. यापूर्वी आमदार बनसोडे यांनी या कोरोना रुग्णालयातील कक्षात काम करणाऱ्यासाठी आमदार निधीमधून शहरातील रुग्णालयास ४५ लाख व जिल्हा रुग्णालयास ५ लाख रुपये निधी पीपीई कीट खरेदी करण्यासाठी दिले.
कोणत्याही परिस्थितीत कोरोनासाठी आवश्यक निधी कमी पडणार नाही परंतू कोरोना साथीच्या वेळी होणाऱ्या खर्चामध्ये भ्रष्टाचार झाल्यास कोणत्याही आणि कितीही उच्च पदस्त अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. या भेटी नंतर आ. बनसोडे यांनी तत्काळ आयुक्त हर्डीकर यांची भेट घेतली.

रुग्णालयातील प्रश्नाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत रुग्णालयाची सुरक्षा वाढवणे, कंत्राटी कर्मचारीवर्गास धोकादायक काम करीत असल्याने वाढीव भत्ता तसेच कोरोना कक्षात काम करीत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गास क्वारंटाइन रजा देण्यात बाबत सकारात्मक कार्यवाही करणार असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली.