कोरोनावर मात करणारी एक लस विकसित – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

0
576

वॉशिंग्टन, दि. ६ (पीसीबी) : कोरोना लसीबाबत अमेररिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे.. “कोरोनाच्या लसीसंदर्भात गुरुवारी आमची महत्त्वपूर्ण बैठक झाली. वैज्ञानिकांनी कोरोनावर मात करणारी एक लस विकसित केली आहे. या लसीचे 20 लाख डोस तयार आहेत. ही लस सुरक्षा संदर्भातील चाचणीत यशस्वी ठरली तर या लसीचं वितरन सुरु केलं जाईल”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

“कोरोना लसीबाबत आम्ही अविश्वसनीय असं चांगलं काम करत आहोत. या कामात आम्हाला सकारात्मक यश मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे. लस विकसित करण्याच्या कामात प्रगतीदेखील होत आहे. ही लस सुरक्षा तपासणीत यशस्वी ठरली तर आमच्याकडे या लसीचे 20 लाख डोस उपलब्ध आहेत. याशिवाय विविध भागात लस पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्थादेखील सज्ज आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
“जगभरातील 186 देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. या देशांमध्ये कोरोनामुळे अनेकांचा जीव गेला. कोरोनाची लस विकसित करण्याच्या दृष्टीने आमचं जगभरातील देशांसोबत काम सुरु आहे. आम्ही चीनसोबतही काम करत आहोत. मात्र, जे झालं ते खूप वाईट झालं. ते व्हायला नको होतं”, असंदेखील डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
याअगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 च्या अखेरीस कोरोनाची लस विकसित होईल, असा दावा केला होता. “अमेरिका सरकार रेमेडेसिवीर औषधावर नजर ठेवून आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसत आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.
दरम्यान, कोरोना लस विकसित करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिकांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेतही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. या प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यावर सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती समोर येत आहे. ‘गिलीड सायंजेस’ या औषध कंपनीने तयार केलेलं ‘रेमेडेसिवीर’ औषध तयार केलं आहे. डॉक्टरांची एक टीम या औषधाच्या क्विनिकल ट्रायलवर नजर ठेवून आहे.