कोरोनाच्या त्सुनामीचा धोका; राहुल गांधी यांनी सुचविले ‘हे’ चार पर्याय

0
524

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) : देशातील कोरोनाची स्थिती दिवसे न् दिवस बिघडत आहे. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा चिठ्ठी लिहिली आहे. राहुल गांधी यांनी देशाला कोरोनाच्या त्सुनामीचा धोका असल्याची भीती वर्तवतानाच पंतप्रधानांना कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी चार उपायही सूचवले आहेत. कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटसचा संशोधकांमार्फत शोध लावला पाहिजे. त्याची माहिती संपूर्ण जगाला दिली पाहिजे आणि देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण केलं पाहिजे, असं राहुल गांधी यांनी या चिठ्ठीत म्हटलं आहे. तसेच सरकारच्या अपयशामुळे देशात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी गरीबांना तात्काळ आर्थिक मदत करावी. त्यांना गेल्या वर्षी प्रमाणे त्रासाला सामोरे जावं लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असं राहुल यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला पुन्हा एकदा मला पत्रं लिहावं लागत आहे. हे लिहिताना मी असहाय आहे. कारण आपला देश पुन्हा एकदा कोरोना त्सुनामीच्या उंबरठ्यावर आहे. अशा संकटावेळी देशातील लोकांची सुरक्षितता हेच आपलं प्राधान्य असायला हवं. आपल्या देशातील लोकांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न करता येईल, ते प्रयत्न करा. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, असा आग्रहही त्यांनी या चिठ्ठीतून केला आहे.

राहुल गांधींनी सूचविलेले चार उपाय –
वैज्ञानिक पद्धतीने व्हायरस आणि त्याच्या म्यूटेशनला देशभर ट्रॅक करा. त्यासाठी जिनोम सिक्वेसिंगसह आजाराचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे.

या व्हायरसच्या विभिन्न स्वरुपाचा वैज्ञानिक पद्धतीने शोध घ्या. सर्व नवीन म्यूटेशनच्या विरोधातील लसींचा काय परिणाम होतो, त्याचं आकलन केलं पाहिजे. सर्व लोकांचं वेगाने लसीकरण करा. पारदर्शी राहावं, तसेच सर्व निष्कर्षांची माहिती जगाला द्यावी. लसीकरणावर स्पष्ट धोरण नाही

आपण जे डबल आणि ट्रिपल म्युटेंट म्हणून पाहत आहोत. ती कोरोना संसर्गाची सुरुवात तर नाही ना? याची मला भीती वाटतेय. या व्हायरसचा अनियंत्रितपणे प्रसार होणं केवळ आपल्या देशातील लोकांसाठीच घातक ठरणारं नाही तर जगासाठीही धोकादायक आहे, असं सांगतानाच केंद्राकडे लसीकरणाचं कोणतंही स्पष्ट धोरण नाही. ज्यावेळी व्हायरस फैलावत होता, त्याचवेळी सरकारने कोरोनावर विजय मिळवल्याची घोषणा केली होती, असंही ते म्हणाले.

देशव्यापी लॉकडाऊनची वेळ –
भारत सरकारच्या अपयशामुळे राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन करावाच लागणार आहे, असं दिसतंय, असं सांगतानाच राहुल गांधी यांनी कोरोनाविरोधातील लढ्यात केंद्र सरकारला काँग्रेसचं संपूर्ण सहकार्य राहणार असल्याचं स्पष्ट केलं. कोरोनाच्या संकटात विविध पक्षांना विश्वासात घ्यावं आणि या संकटाचा एकजुटीने मुकाबला करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.