कोरोनाच्या ढासळत्या स्थितीवर जनहित याचिका; भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची न्यायालयात धाव

0
613

प्रतिनिधी (पीसीबी) : कोरोना संदर्भात अमरावती मध्ये उद्भवलेली व ढासळत चाललेली परिस्थिती हाताळण्यात शासन व प्रशासन अधिक गतिमान करण्यासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनासह अमरावती जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीसेस जारी केल्या असून त्यांना ५ मे ला न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागणार आहे.

अमरावती शहराची कोरोना रुग्णांच्या संदर्भात परिस्थिती ढासळल्याने भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. काल या याचिकेवर दोन तास सुनावणी चालली. मूळचे अमरावतीचे असलेले ऍड. पंकज वासुदेव नवलाणी यांनी अमरावतीच्या ढासळत्या परिस्थितीवर जोरदार युक्तिवाद केला. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनुक्रमे ऍड. उल्हास औरंगाबादकर व ऍड सुमंत देवपूजारी यांनी युक्तिवाद मांडला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी याचिकेतील मुद्द्यांना गंभीर मानून आयसीएमआर व राज्य सरकारसह जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक अशा सात लोकांना नोटीसेस जारी केल्या आहेत.

ऍड. नवलाणी यांनी टेस्टिंग लॅबोरेटरी चा मुद्दाही रेटून धरला. मात्र, टेस्टिंग लॅबोरेटरी साठी अमरावतीहून अधिकृतपणे अर्जच आलेला नसल्याचे विदारक वास्तव न्यायालयासमोर आले. टेस्टिंग लॅबोरेटरी विषयी कुठलीच सुस्पष्टता व योग्य प्रक्रिया झाली नसल्याचेही न्यायालयात उघडकीस आले. अमरावतीतील कोरोना रुग्ण विविध परिसरातील आहेत. हे परिसर एकमेकांना लागून नाही. हे परिवार कोणामुळे बाधित झाले याचा सोर्स सापडलेला नाही.

याचाच अर्थ असा की अमरावती मध्ये कोरोनाची लागण करणारे जिवंत कोरोना बॉम्ब अजुनही आरोग्य यंत्रणेच्या व जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीपथात नाहीत. ते अदृश्य असणे अत्यंत घातक आहे. हा सोर्स शोधण्यात यंत्रणा कुचकामी ठरली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे उघडकीस आलेली बहुतांश प्रकरणे रुग्ण मृत झाल्यानंतर यंत्रणेच्या हाती आले आहेत. मृत व्यक्तींच्या आधारे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या समोर दिसते आहे. मृत रुग्णांच्या परिवाराच्या भोवतीच यंत्रणा फिरते आहे. शहरातील विविध वस्त्यांमध्ये कोरोनाची लागण करणारे बॉम्ब शोधण्यात यंत्रणेला स्वारस्य व प्राधान्यक्रम नसल्याने दिवसेंदिवस अमरावतीची हालत गंभीर होत जाणार आहे. यामुळे आगामी पंधरवाड्यात स्फोटक स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जिवंत बॉम्ब शोधण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण आणि मोठ्या प्रमाणात टेस्टिंग ची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत नगण्य टेस्टिंग आहे. अमरावतीचा मृत्युदर जगात सर्वाधिक आहे. आता पर्यंत 7 मृत्यू झाले आहेत. अन्यत्र कुठेच एवढे मृत्यूचे प्रमाण नाही. लाॅडाऊनचा फज्जा उडाला आहे. बफर व कनटेन्मेंट झोन कागदावरच आहेत. कुठलीच कठोर कारवाई नाही. त्यामुळे आगामी पंधरवाड्यात अमरावतीची स्थिती धारावी पेक्षाही वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे महत्वपूर्ण मुद्दे या याचिकेच्या माध्यमातून ऍड. पंकज नवलाणी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.