“कोरेगाव भीमा हिंसाचाराची फडणवीसांना पूर्वकल्पना होती”

0
483

 

पुणे, दि.१ (पीसीबी) – पुणे येथील कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना होती. या दंगलीला त्यांचीच फूस होती, असा आरोप बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. मंगळवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मेश्राम यांनी केली. त्यावेळी उफाळलेल्या दंगलीला तत्कालीन राज्य शासन जबाबदार आहे. तसेच या दंगलीमागे मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा हात आहे. याबाबतचे पुरावे भारत मुक्ती मोर्चाकडे आहेत. हे पुरावे उच्च न्यायालय आणि चौकशी आयोगासमोर सादर करण्यात आले आहेत. यानंतरही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना क्लिनचिट दिल्याचे म्हटले होते, असेही त्यांनी नमूद केले.