“कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला”; संजय राठोड यांच्या समर्थकांची तुफान घोषणाबाजी

0
228

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे आज पहिल्यांदा प्रसारमाध्यमांसमोर आले आणि या सर्व प्रकरणावर त्यांनी मौन सोडलं. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये त्यांचं नाव समोर आल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली. मात्र मुख्यमंत्र्यांनी राठोड यांच्या बाबतीत खूप संयमी भूमिका घेतली. आज तब्बल १४ दिवसानंतर पोहरादेवीत राठोड यांनी दाखल होऊन दर्शन घेतल्यानंतर आपली भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली. तेव्हा राठोड यांच्या समर्थकांनी तुफान घोषणाबाजी आणि पोस्टरबाजी केली. गेल्या १४ दिवसांपासून संजय राठोड अज्ञातवासात गेल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यावर बोलताना संजय राठोड यांनी ‘मी १४ दिवस नाही, तर फक्त १० दिवस माध्यमांपासून दूर गेलो होतो, पण मुंबईतल्या माझ्या फ्लॅटमधून माझं प्रशासकीय काम सुरूच होतं’, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

दरम्यान, संजय राठोड आज प्रसारमाध्यमांसमोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरजोरात घोषणाबाजी आणि तुफान पोस्टरबाजी सुरु झाली. यावेळी त्यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन करताना “कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला” अशा घोषणाही दिल्या जात आहेत. मात्र, शक्तीप्रदर्शन करण्याच्या नादात राज्यावर घोंघावणाऱ्या करोना संकटाचा त्यांच्या समर्थकांना विसर पडल्याचंच दिसलं. इतकंच काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनालाही संजय राठोड आणि समर्थकांनी पायदळी तुडवल्याचं चित्र समोर आलं.