“केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे ५० हजार कोटी अद्यापही दिले नाही”

0
370

मुंबई, दि.२० (पीसीबी) : काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दराने अक्षरशः उच्चांक गाठला. केंद्राने इंधन दरावरच्या करात कपात केल्यानंतर सामान्यांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र तरीही पेट्रोल-डिझेलचे दर राज्यात बऱ्याच ठिकाणी १००च्या वरच आहेत. महाराष्ट्र सरकारनेही व्हॅट व इतर करात कपात करावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकार कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचे जीएसटीचे 50 हजार कोटी रुपये केंद्राने अद्याप दिले नसल्याचे त्यांनी म्हटले.

इगतपुरी तालुक्यात काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आज सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी झालेल्या सभेनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, इंधन दरवाढीचा आम्ही विरोध केला आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर इंधनावरील करात वाढ केली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे ५० हजार कोटी केंद्राने अद्यापही दिले नाहीत. करोनामुळे उत्पन्न घटले असून पगार देण्यासाठीही कर्ज काढावे लागत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

भाजपाकडून एसटी आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. सरकारी सेवेत घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. मात्र, हा निर्णय घेणे कठीण असल्याचे थोरात यांनी म्हटले. राज्यात भाजपाची सत्ता असताना त्यांनी एसटीचे विलिनीकरण केले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेणे शक्य नसल्याचे भाजपाच्या तत्कालीन प्रमुख मंत्र्याने म्हटले होते. आता भाजपा आंदोलन करत असल्याचे थोरात यांनी म्हटले. एसटीच्या खासगीकरणाबाबत चर्चा होत असेल. मात्र, त्याबाबत आम्हाला अधिकृतपणे माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एसटीच्या आंदोलनावर परिवहन मंत्री अनिल परब हे स्वत: लक्ष देत आहेत. करोना काळातही आम्ही कर्मचाऱ्यांचे पगार केले. त्याशिवाय बोनसही दिला असल्याचे थोरात यांनी सांगितले.