केंद्रातील सत्ताधारी भाजपला टोला, “आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद वाटतो”

0
177

मुंबई, दि.२३(पीसीबी) : ‘संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद वाटतो, अशा शब्दांत पवारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला टोला लगावला आहे. वर्ष २००९, २०१४ आणि २०२० मधील निवडणुकांमधील प्रतिज्ञापत्रांवरील माहितीवरून प्राप्तिकर विभागाने आपल्याला नोटीस बजाविली असून, त्याला लवकरच उत्तर देऊ, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आपल्याला सोमवारीच नोटीस प्राप्त झाली. खासदार सुप्रिया सुळे यांनाही नोटीस बजाविण्यात येणार आहे. पवार यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे कि, राजकीय विरोधकांना आयकर विभागाच्या माध्यमातून नोटिसा बजावून त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून ही नोटीस बजाविण्यात आली असून उत्तर देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारला जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. यामुळेच आपण लगेचच या नोटिसीला उत्तर देऊ, असे पवार यांनी सांगितले. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हा चौकशीसाठी स्वत:च संचालनालयाच्या कार्यालयात येतो, असे पवारांनी कळविले होते. अखेर मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांन ना पवारांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीने वातावरण तापविल्याने घराबाहेर पडू नये म्हणून विनंती करावी लागली होती.

पवार पुढे माहिती देताना असंही म्हणाले कि, “राज्याच्या विधिमंडळात एकमताने मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे, तो कायदा टिकवला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर मंत्री व काद्याचे जाणकार यांच्याशी चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात अपील दाखल करणे आवश्यक होते, त्यानुसार ते दाखल करण्यात आले आहे. या शिवाय मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्याकरिताच आपण दोन दिवस मुंबईत होतो. यामुळे राज्यसभेत कृषी विधेयके चर्चेला आली तेव्हा उपस्थित राहू शकलो नाही.