‘केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्रावरचे संकट देशावरचे मानून मोदी सरकारने सढळ हाताने मदत करावी’

0
218

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : एकंदरीत महाराष्ट्रावर अस्मानी संकट पुन्हा एकदा कोसळले असून या पूरपरिस्थितीचा राजकीय आखाडा कोणी करू नये. ‘सरकार काय करते? इतका पाऊस पडत असताना सरकार झोपले होते काय? सरकारची मदत का पोहोचली नाही?’ असे प्रश्न कोणाला विचारायचेच असतील तर थोडी कळ काढावी, असं आवाहन आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष भाजपला केलं आहे. तसंच केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्रावर संकट आहे. मोदी सरकारने सढळ हाताने मदत करावी, अशी मागणी अग्रलेखातून करण्यात आली आहे.

कोकणात जगबुडी नावाची नदी आहे. त्या जगबुडीने अति रौद्ररूप धारण केले आहे. जगबुडी म्हणजे काय हे आज कोकणातील जनता अनुभवत आहे . ‘निसर्ग’ वादळाच्या आपत्तीतून कोकण नुकतेच कोठे डोके वर काढीत होते तोच कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात व्हावा ही दुःखाचीच गोष्ट आहे. परमेश्वराजवळ आता अशी प्रार्थना आहे की, आणखी किती कठोर परीक्षा घेणार आहेस? आता यापेक्षा अधिक संकट त्याने महाराष्ट्रावर आणू नये . महाप्रलयाचे तडाखे महाराष्ट्राने अनेकदा पचवले, पण हे संकट जगबुडीसारखे आहे. सरकारने, मंत्र्यांनी, प्रशासनाने, राजकीय कार्यकर्त्यांनी या वेळी त्यांची अत्युच्च सेवा संकटग्रस्तांसाठी द्यावी!

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटले आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

परभणीत अनेक गावांचा संपर्क तुटल्याने लोक हवालदिल झाले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रावर पाऊस काळ बनून कोसळत आहे. कोरोनाच्या संकटाशी राज्य व जनता लढत असताना हे ओले संकट उभे ठाकले आहे. कालपर्यंत ज्या नद्या कोरड्याठाक पडल्या होत्या त्या आता धोक्याची पातळी ओलांडून गावात, घरांत शिरल्या आहेत. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. 77 बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. सातारा अडचणीत आहे. कोयना भरून वाहत आहे. अमरावती, मेळघाट, नाशिकमध्ये पुराचेच भयावह चित्र आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातही पाणी शिरल्याने तेथे हाहाकार माजला असण्याची शक्यता आहे.

एकंदरीत महाराष्ट्रावर अस्मानी संकट पुन्हा एकदा कोसळले असून या पूरपरिस्थितीचा राजकीय आखाडा कोणी करू नये. ‘सरकार काय करते? इतका पाऊस पडत असताना सरकार झोपले होते काय? सरकारची मदत का पोहोचली नाही?’ असे प्रश्न कोणाला विचारायचेच असतील तर थोडी कळ काढावी. राज्य पाण्याखाली गेले आहे. राज्य पुराच्या प्रवाहाशी झुंज देत आहे. अशा वेळी महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांनी सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे. केंद्राने तातडीने मदत देणे गरजेचे आहे, अशी मागणीही आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. लाखो लोक निराधार, बेघर, अस्तित्वहीन झाले. त्यांची घरेदारे, संसार वाहून गेले. त्यांना पुन्हा उभे करावे लागेल. त्यासाठी मोदी सरकारला पुढाकार घ्यावाच लागेल, असंही अग्रलेखात म्हटलंय.

आज परिस्थिती अशी आहे की, ठिकठिकाणी जनजीवन बंद पडले. रस्ते वाहतूक खड्डय़ात गेली आहे. लहान पूल, साकव प्रवाहात उखडून गेले आहेत. पावसाचे फक्त झोडपणे आणि दडपणेच चालले आहे. गावागावांत आक्रोश आणि किंकाळ्याच ऐकू येत आहेत. हे सर्व केंद्र सरकारलाही गांभीर्यानेच घ्यावे लागेल. केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्रावर संकट, मोदी सरकारने सढळ हाताने मदत करावी. “कोकणात जगबुडी नावाची नदी आहे. त्या जगबुडीने अति रौद्ररूप धारण केले आहे. जगबुडी म्हणजे काय हे आज कोकणातील जनता अनुभवत आहे. याक्षणी पुरात अडकलेल्या लोकांची गरज काय आहे? त्यांना नौदलाच्या बोटी, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवायला हवे. त्यांच्या निवारा व जेवणाची सोय व्हायला हवी. त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळायला हवी. राज्यावर संकट आहे. केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्राचे संकट हे देशावरचे संकट मानून मोदी सरकारने महाराष्ट्राला सढळ हस्ते मदत करावी, ही ‘मऱ्हाठी’ जनतेची अपेक्षा आहे”, असं अग्रलेखात म्हटलंय.