कृषि विधेयकाविरोधात पंजाबात आंदोलने, शेतकऱ्यांकडून महामार्गावर ‘रस्ता रोको’

0
172

देश,दि.२०(पीसीबी) – विरोधकांचा विरोध डावलत कृषि विषयक विधेयके आज राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे संसदेत मंजूर करण्यात आली आहेत. दुसरीकडे मात्र, करोनाकाळातही पंजाब – हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मात्र या विधेयकाविरुद्ध आपलं आंदोलन तीव्र केलंय. अनेक शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहेत.

शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ‘रस्ता रोको’ आंदोलन करत महामार्ग ठप्प करून टाकलेत. शेकडोंच्या संख्येनं शेतकरी अंबालाच्या रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. ट्रॅक्टरसहीत रस्त्यावर आलेल्या या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केलीय. अनेक आंदोलनकर्त्यांनी झेंडे आणि बॅनर दाखवत सरकारच्या धोरणाचा विरोध केलाय.

पंजाबमध्ये मोहालीजवळ जीरकपूरमध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ मोठ्या संख्येत शेतकरी एकत्र जमले. कृषि विषयक विधेयकाविरोधात चंदीगड ते दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या तयारीत हे शेतकरी आहेत. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून करनाल हायवे ब्लॉक करण्यात आलाय. शेतकरी दिल्ली – अंबाला – चंदीगड महामार्ग रोखण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान पंजाबहून मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी दिल्लीकडे आपली वाटचाल सुरू केलीय. या शेतकऱ्यांना हरियाणातल्या अनेक संघटनांचं समर्थन आणि पाठबळ मिळालंय. त्यामुळे पोलिसांनाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंबाला सीमेपासून राजधानी दिल्लीपर्यंत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.